पुणे : कोल्हापुरात खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून रविवार पेठेतील कापड व्यापाऱ्याला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात व्यापाऱ्याला कापडी पिशवीत सोन्याप्रमाणे दिसणाऱ्या पिवळय़ा रंगाची धातूची नाणी देऊन चोरटे पसार झाले. 

याबाबत एका व्यापाऱ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कापड व्यापारी आहेत. त्यांचे रविवार पेठेत कापड दुकान आहे. एक महिला आणि दोन साथीदार त्यांच्या दुकानात आले. चोरटय़ांनी खरेदीचा बहाणा केला. त्यानंतर त्यांनी कापड व्यावसायिकाला कोल्हापुरात खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती तुम्हाला स्वस्तात देतो, असे त्यांनी सांगितले.  चोरटय़ांनी केलेल्या बतावणीवर व्यावसायिकाने विश्वास ठेवला. सोन्याच्या नाण्यांसाठी अकरा लाख रुपये द्यावे लागतील, असे चोरटय़ांनी त्यांना सांगितले. त्यावर व्यापाऱ्याने त्यांना ११ लाख रुपये देऊन व्यवहार ठरवला.

 चोरटय़ांनी त्यांना पिवळय़ा रंगाची धातूची नाणी एका पिशवीतून दिली. व्यावसायिकाकडून पैसे घेऊन चोरटे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करत आहेत.