लहानपणापासून स्काऊट-गाईड शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारित पिढी निर्माण करायची आणि व्याख्याने, पुस्तके यांपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडणारे शिक्षण मदानावर येऊन मुलांना द्यायचे, यासाठी झटणाऱ्या दोन वेगळ्या संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहेत. मुलांना खेळ, गाणी, गोष्टी आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यासोबत कायमच प्रयोगशीलतेवर भर दिला जातो.  या दोन संस्था शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असलेले माधव धायगुडे यांच्याशी साधलेला संवाद.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही संस्थांची स्थापना कधी झाली व संस्थापक कोण आहेत?

सन १९०८ मध्ये इंग्लंडमध्ये सुरू झालेली स्काऊट चळवळ भारतात १९०९ मध्ये अँग्लोइंडियन व ख्रिश्चन मुलांसाठी सुरू झाली आणि िहदी मुलांसाठी १९१६ मध्ये सुरू झाली. इंडियन बॉय स्काऊट असोसिएशनचे एक कार्यकत्रे प्रा. व्यंकटेश्वरन यांनी पुण्यात घेतलेल्या वर्गामध्ये सुमारे दीडशेपकी वि. मा. देशमुख, मो. ना. नातू व डी. पी. जोशी होते. पुढे २६ जणांचा वचनविधी झाल्यावर देशमुख यांनी शिवाजी पथक आणि नातू यांनी प्रताप पथक सुरू केले. पुढे शिवाजी पथक बंद पडल्यानंतर दोन्ही मिळून श्री शिवाजी पथक हे मो. ना. नातू व डी. पी. जोशी यांनी सुरू ठेवले. हीच या श्री शिवाजी कुलाची मुहूर्तमेढ जानेवारी १९१९ मध्ये रोवली गेली. याच वर्षी इंडियन बॉय स्काऊट असोसिएशनची स्थानिक संस्था म्हणून पुणे शहर स्थानिक संस्था स्थापन झाली व श्री शिवाजी कुल संस्थेशी संलग्न झाले, ते आजतागायत आहे.

संस्थांचे काम कोठे चालत असे आणि कार्यपद्धती काय?

सुरूवातीला शाळेचा वर्ग, मग खासगी बखळ अशा ठिकाणी पथकाचे कार्य चाले. १९२७ मध्ये पुणे शहर स्थानिक संस्थेस सध्याची जागा सरकारकडून मिळाल्यावर शिवाजी कुलाचे दैनिक खेळ व कामे तेथे सुरू झाली. या जागेवर भोरचे अधिपती बाबासाहेब पंतसचिव यांच्या उदार देणगीने कार्यालयीन इमारत झाली व मदान ‘पंतसचिव स्काऊट क्रीडांगण’ म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्थापक मो. ना. नातू व डी. पी. जोशी यांनी सुरुवातीपासूनच चांगले संस्कार होण्याची घडी बसवली व काही उत्तम परंपरा निर्माण केल्या. श्री शिवाजी कुलाच्या एका पथकापासून संख्या वाढल्याने मुलांची व पथकांची संख्या वाढली. शिवाजी पथकाचे रुपांतर श्री शिवाजी कुल या स्काऊट पथकांच्या समूहात झाले व पथकाचे कार्य पुण्यातील तीन ते चार मदानांवर एकाचवेळी सुरू झाले. तसेच, १९४५ मध्ये कुलातील माजी कुलवीर एकत्र आले व त्यांनी साने गुरूजी ( हेही शिवाजी कुलाचे स्काऊट होते) यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी कुलवीर माजी कुलवीर संघ स्थापन केला. स्काऊट चळवळीमध्ये जगभरात आपला वेगळा ठसा उमटवित मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. आज पुण्यासह देशभरातील विविध शाळांमध्ये स्काऊटचा अभ्यासक्रम शिकविला जात असला, तरी आपले वेगळेपण जपत पुण्यातील शाळांमध्ये आणि विविध शाळांमधील मुलांना एकत्रित करुन दररोज सायंकाळी स्काऊट शिक्षणासह शारीरिक शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न दोन्ही संस्थांतर्फे सलग ९९ वर्षांपासून केला जात आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक एन. के. महाजन यांच्यापासून ते अगदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीधर गुप्ते यांच्यापर्यंत विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे दिग्गज संस्थेचेच कुलवीर होते. आजही समाजाच्या विविध क्षेत्रांत आणि शासकीय सेवांमध्ये पथकाचे आजी व माजी कुलवीर उच्चपदावर कार्यरत आहेत. लहानपणी पथकामध्ये येत असताना झालेली जडणघडण आणि संस्कार यांमुळे आम्ही आज या पदांवर पोहोचू शकल्याचे अनेक जण अभिमानाने सांगतात, हे विशेष.

श्री शिवाजी कुलाचे विशेष उपक्रम कोणते?

कुलातर्फे १९२२-२३ मध्ये ‘बालगीते’ असे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर १९५२-५३ मध्ये ‘गीते-प्रार्थना-आरोळ्या’ हे पुस्तक प्रकाशित केले. ते आजही नवीन स्वरूपात आहे. पोहणे वर्ग ही कुलाची विशेष बाब होय. दरवर्षी पुण्यातील टिळक तलावावर १९२० पासून पोहणे वर्ग होत असे व त्यामुळे प्रत्येक कुलवीरास पोहणे येतेच येते. याशिवाय श्री शिवाजी कुलाने आपला रौप्यमहोत्सव, सुवर्ण महोत्सव, नव्वदपूर्ती मेळावा साजरे केले. या महोत्सवानिमित्त स्काऊटर, गाईडर, चर्चासत्रे, युवकांसाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात आले. तसेच विविध सहली व प्रत्येक वेळी एक मोठा वननिवास आयोजित केला होता. याशिवाय जर्मनीसह, कलकत्ता, दिल्ली, इंग्लंड, म्हैसूर यांसारख्या विविध ठिकाणी झालेल्या महामेळाव्यांमध्ये संस्थेतील मुला-मुलींनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

संस्थेची सध्याची कार्यपद्धती आणि शंभरीपूर्ती नंतरचे पुढील नियोजन कसे असेल?

मुलांची मुलांसाठी मुलांनी चालविलेली चळवळ म्हणून स्काऊट चळवळीकडे पाहिले जाते. हेच ब्रीदवाक्य समोर ठेवून संस्थेचे काम अव्याहतपणे सुरू आहे. स्थानिक संस्थेंतर्गत पुणे शहरातील दीडशेहून अधिक शाळा संलग्न असून सात ते आठ हजारांहून अधिक स्काऊट-गाईड कार्यरत आहेत. तर, श्री शिवाजी कुलामध्ये बनी गट (बालगट) व कब, बुलबुल, स्काऊट, गाईड,रोव्हर, रेंजर म्हणजेच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची मिळून दररोज सुमारे अडीचशे मुले-मुली मदानावर खेळत असतात.

रोज थोडावेळ स्काऊट शिक्षण, तर आठवडय़ातून एक दिवस संपूर्ण वेळ स्काऊट शिक्षण असते. विभागांमध्ये संघ पद्धती असते. शिवाजी कुलात दैनंदिन कामासाठी अधिक जणांचे मिळून एक कुलमंडळ व कार्य करण्यास एक मंत्रिमंडळ अशी रचना आहे. रोज सायंकाळी खेळ व वर्षभरामध्ये विविध सांस्कृतिक उत्सव, गणेशोत्सव, वर्षांतून एकदा सात दिवस खेळांच्या स्पर्धा, मदानी स्पर्धा म्हणजेच कुलसप्ताह आयोजित केला जातो. शंभरपूर्तीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आजच्या पिढीपर्यंत प्रथमोपचार, होकायंत्रातून दिशा ओळख, पायोनिअरींग, तात्पुरता निवारा उभारणे, चूल पेटविणे यांसारख्या उपक्रमांतून प्रत्येकामधील नेतृत्वगुण विकसित करीत संस्कारित पिढया घडविण्याचा संकल्प दोन्ही संस्थांनी केला आहे.

((  माधव धायगुडे  ))

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhav dhayagude interview in loksatta scout guide education
First published on: 04-01-2018 at 03:39 IST