दाखल्यांसाठी जादा पैसे; दोन केंद्रांवर कारवाई

शहरातील महा-ई सेवा केंद्रांमध्ये विविध दाखले देण्यासाठी नागरिकांकडून जादा पैसे आकारून नागरिकांची लूट करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शासकीय दरांपेक्षा जादा पैसे घेतल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांत दोन केंद्रांना प्रशासनाने टाळे ठोकले आहे. त्यामध्ये शुक्रवार पेठ येथील मामलेदार कचेरीसमोरील आणि नवी पेठेतील गौरी एण्टरप्रायजेस या दोन महा-ई-सेवा केंद्रांचा समावेश आहे. दाखल्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारल्यास महा-ई-सेवा केंद्रांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

गेल्या बारा वर्षांपासून शुक्रवार पेठेत कार्यरत असलेल्या केंद्रात नागरिकांकडून शासकीय दराऐवजी अधिक शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहर तहसीलदारांनी २६ नोव्हेंबरला या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. केंद्रामध्ये दरपत्रकाचा फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, या केंद्रचालकाने दरपत्रकाचा फलक लावलेला नव्हता. या ठिकाणी आलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडून केंद्रचालक अधिक शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास आले.

याशिवाय केंद्र चालवण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीकडून केंद्र चालवण्यात येत असल्याचेही आढळून आले. तपासणीनंतरही या केंद्राबाबत तक्रारी आल्यानंतर अखेर मंगळवारी छापा टाकण्यात आला. त्या वेळीही नागरिकांकडून जास्त शुल्क आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच सूचना देऊनही केंद्रात दरपत्रकाचा फलक लावण्यात आला नव्हता. तर, नवी पेठेत गौरी एण्टरप्रायजेस यांना केंद्र सुरू करण्यासाठी परवाना दिला होता. मात्र, संबंधिताने मामलेदार कचेरीजवळ राष्ट्रभूषण चौकात केंद्र सुरू केले होते. परिणामी जिल्हा प्रशासनाकडून ही दोन्ही केंद्रे मोहोरबंद करण्यात आली.

दाखल्यांसाठीचे शासकीय शुल्क आणि कालावधी

प्रतिज्ञापत्रासाठी ३३ रुपये ६० पैसे (एक दिवस), उत्पन्न प्रमाणपत्रासाठी ३३ रुपये ६० पैसे (१५ दिवस), रहिवासी प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे (१५ दिवस), वय/अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे (१५ दिवस), ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे (१५ दिवस), नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे (२१ दिवस), ऐपतदार दाखला ३३ रुपये ६० पैसे (२१ दिवस), महिला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे (२१ दिवस), आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे (२१ दिवस) आणि जात प्रमाणपत्रासाठी ५७ रुपये २० पैसे (४५ दिवस)

दर असे..

जात प्रमाणपत्र वगळता अन्य सर्व दाखल्यांसाठी ३३ रुपये ६० पैसे आकार आहे. जातीच्या दाखल्यासाठी ५७ रुपये २० पैसे दर आहे. ३३ रुपये ६० पैसे शुल्कापैकी दहा रुपये राज्य सरकारला, दहा रुपये प्रक्रिया शुल्क टीसीएक्स कंपनीला, तीन रुपये ६० पैसे वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि उर्वरित दहा रुपये केंद्र चालकाला मिळतात.