पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन महामंडळाने नव्याने बांधलेले हेरिटेज व अन्य प्रकारचे सूट्स हे नवे आकर्षण ठरत असून नूतनीकरणानंतर महामंडळाच्या पर्यटक निवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाबळेश्वरमधील सनसेट पॉइंट रस्त्यावर पर्यटन महामंडळाचे पर्यटक निवास असून जुन्या काळात बांधण्यात आलेल्या तेथील इमारतींचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यांचे नूतनीकरण करण्याची योजना महामंडळाने हाती घेतली होती. हे काम पूर्ण झाले असून वारसा (हेरिटेज) वास्तूचे मूळ स्वरूप कायम राहिले आहे आणि पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था पंचतारांकित झाली आहे. त्यामुळे या नूतनीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पर्यटन महामंडळाचे विपणन व्यवस्थापक राजेश जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नूतनीकरण केलेल्या हेरिटेज सूट्समध्ये सर्वप्रकारच्या पंचतारांकित सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या स्वागतापासून उत्तम प्रकारच्या आदरातिथ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट वैशिष्टय़पूर्ण असल्याचेही सांगण्यात आले.
एखाद्या जुन्या, ऐतिहासिक वास्तूत राहत असल्याचा अनुभव घेत असतानाच तारांकित सुविधांचाही लाभ येथे येणाऱ्या पर्यटकांना दिला जात आहे. हेरिटेज सूट्स बरोबरच अन्य प्रकारचेही नावीन्यपूर्ण सूट्स येथे बांधण्यात आले आहेत. हे सर्व सूट्स वातानुकूलित असून आतील फर्निचरसह त्या त्या सूटमधील सर्व गोष्टी वैशिष्टय़पूर्ण असतील, याची काळजी घेण्यात आली आहे.