पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यात पीसीेएम गटात अकरा विद्यार्थ्यांना आणि पीसीबी गटात सतरा विद्यार्थ्यांना शंभर पर्सेटाईल मिळाले आहेत.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी घेतल्या जातात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीईटी लांबणीवर पडली होती. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी नोंदणी केलेल्या ५ लाख ४ हजार ८३५ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख १४ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८२.२० टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यात १ लाख ९२ हजार ३६ विद्यार्थ्यांनी पीसीएम गटाची, तर २ लाख २२ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी पीसीबी गटाची परीक्षा दिली. निकाल जाहीर झाल्याने आता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीसीएम गटात शंभर पर्सेटाईल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तपन चिकणीस (कोल्हापूर),  वेदांत चांदेवार (नागपूर), दिशी िवची, हर्ष शहा, अर्ष मक्नोजिया, नीरजा पाटील, क्रिशा शाह (मुंबई), साताऱ्याचा सचिन सुगदरे, अमरावतीची स्नेहा पजाई, पुण्याचा आदित्य मेहता, ठाण्याचा जनम खंडेलवाल यांचा समावेश आहे. तर पीसीबी गटात अयमान फातेमा मोहम्मद अमजदुल्लाह, अनिरुद्ध अईनवाले (नांदेड), राजवीर लखानी, कल्याणी कुडाळकर, क्रिष्णप्रिया नंबूथिरी (मुंबई), प्राजक्ता कदम, शुभम बेनके, ज्ञानेश्वरी राऊत (पुणे), अशनी जोशी (नागपूर) , मोहित पाटील (नाशिक), सर्वेश झोपे (जळगाव), आदर्श थोरात (सांगली), प्राची धोटे, तन्वी गहुकर (अकोला), जेनिका कलाले (लातूर), निकिता मौर्य, गायत्री नायर (ठाणे) यांना शंभर पर्सेटाईल मिळाल्याची माहिती सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

अन्य परीक्षांचेही निकाल जाहीर

शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २ हजार २७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील प्रत्यक्ष परीक्षा आणि मैदानी चाचणी दिलेल्यांपैकी १ हजार ६४० उमेदवार पात्र ठरले. चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ३ हजार ९४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेले सर्व १ हजार ३३३ उमेदवार पात्र ठरले. तीन वर्षे मुदतीच्या बीएड-एमएड अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी १ हजार ५०७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेले ७२८ उमेदवार पात्र ठरले. तर शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.एड) अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी २ हजार ७७९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेले सर्व ७२८ उमेदवार पात्र ठरले.