पुणे : ‘काँग्रेस देशातील सर्वांत जुना आणि अनुभवी पक्ष असून, तो विचारधारेवर चालतो. काँग्रेसकडे सक्षम आणि समर्थ नेतृत्व, कार्यकर्ते आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला आणि मंत्रिमंडळाकडे पाहिले, तर काँग्रेसचेच नेते दिसतात. त्यामुळे काँग्रेस पक्षाला गळती हा विरोधकांचा कांगावा आहे,’ अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सपकाळ यांच्यासह सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘एक कोटी सदस्य आणि मोदींसारखे नेतृत्व आहे, असे भाजप नेते म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून, पोकळ आहे. म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत आहे. ही शोकांतिका आहे,’ असे सपकाळ यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाली, यात दुमत नाही. भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर डल्ला मारत आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. काँग्रेस नेते घेतल्याशिवाय भाजपला कोणत्याही निवडणुकांना सामोरे जाता येत नाही. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेसयुक्त भाजप कधी झाला, हे त्यांनाही कळलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी जरा मागे वळून पाहिले, तर अर्ध्याहून अधिक मंत्री हे काँग्रेस पक्षातील असल्याचे दिसून येईल.’
‘ट्रॅक्टरला ‘ब्लॅक बॉक्स’जोडण्याबाबतचे पत्रक सरकारने काढले आहे. त्याचा भार शेतकऱ्यांवरच पडणार आहे. असे निर्णय सरकार का घेते हेच समजत नाही. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू,’ असे सतेज पाटील यांनी सांगितले.
‘राज्यातील महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सरकारने राज्याला खाईत ढकलेले आहे. आम्ही मतचोरीचे आरोप केले तेव्हा पुरावे मागितले. आता पुरावे दिले, तर उशीर झाला, असे म्हणत आहेत,’ असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
‘भाजपचा कबुतर जिहाद’
‘कबुतरांमुळे नागरिकांना जीवघेणे आजार होत आहेत. पण, भाजप आपल्या मतदारांसाठी कबुतरखाने वाचवून कबूतर जिहाद आणण्याचा प्रयत्न करत आहे. कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे, तसाच नागरिकांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांमुळे त्यांना जीवघेणा आजार होऊन त्यांचा जीवन जगण्याचा अधिकार धोक्यात येता कामा नये,’ अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.