तीन विद्यापीठे, तीन महाविद्यालयांचा समावेश

पुणे : देशभरातील शिक्षण संस्थांसाठीच्या ‘स्वच्छता क्रमवारी’मध्ये राज्यातील सहा शिक्षण संस्थांना स्थान मिळाले आहे. त्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि तीन महाविद्यालयांनी स्थान पटकावले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतीच ही क्रमवारी जाहीर केली. यंदाच्या क्रमवारीसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एकूण नऊ गटांमध्ये मिळून एकूण ४२ विद्यापीठे आणि महाविद्यालयांची निवड केली. देशभरातील शिक्षणसंस्थांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या या संस्थांची या क्रमवारीत निवड झाली. स्वच्छतेसाठीच्या विविध निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षण संस्थांना यादीत स्थान देण्यात आले आहे.

निवासी विद्यापीठांच्या गटात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने तिसरा, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने नववा क्रमांक मिळवला. अनिवासी विद्यापीठांत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला चौथे स्थान मिळाले.  अनिवासी महाविद्यालयांत नवी मुंबईचे महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयाने पहिला, कोल्हापूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटने दुसरा आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्याल-याने तिसरा क्रमांक मिळवला.