वीज वितरण यंत्रणेत काम करणारे महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण होण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने असे प्रकार होत असलेल्या भागातील कार्यालये बंद करण्याचे आदेश मुख्यालयातून देण्यात आले आहेत. सुरक्षेची हमी दिल्याशिवाय कार्यालये सुरू न करण्याची भूमिका ‘महावितरण’ने घेतली आहे. एक-दोन व्यक्तींकडून मारहाणीचे प्रकार होत असले, तरी ‘महावितरण’च्या या निर्णयामुळे संबंधित विभागातील वीजयंत्रणेवर परिणाम होऊन त्याचा फटका सर्वच ग्राहकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महावितरण कंपनीच्या पुणे परिमंडलातील राजगुरूनगर विभागातील लोणावळा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विठ्ठल आढळ यांना मागील आठवडय़ात जबर मारहाण करण्यात आली. याबाबत लोणावळा पोलिसांकडे गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर वीजसेवेतील कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विजेसारखी अत्यावश्यक सेवा देण्याच्या कामात असलेलय़ा महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, शिवीगाळ करण्याबरोबरच मालमत्तेची हानी करण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. त्याचा परिणाम ग्राहकसेवेवर होत आहे. त्यामुळे त्या भागात असे प्रकार घडत असल्यास किंवा असुरक्षितपणाच्या वातावरणात ग्राहकसेवा देणे कठीण आहे, असे दिसून येत असल्यास त्या भागातील कर्मचाऱ्यांनी ‘महावितरण’चे कार्यालय कुलूप लावून बंद करावे. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथून तत्काळ निघून जाण्याचे आदेश मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.
‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांकडून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ग्राहकांना सेवा दिली जाते. मात्र, कोणत्याही कारणावरून किंवा दबाव व धाक निर्माण करण्यासाठी मारहाण होत असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या कार्यालयात मारहाणीचा प्रकार होईल, ते कार्यालयच बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सुरक्षेबाबत पुरेशी हमी दिली जात नाही तोपर्यंत कार्यालयाचे कामकाज पूर्ववत केले जाणार नाही. कार्यालय बंद असलेल्या कालावधीतही कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मारहाणीच्या घटना किंवा बेजबाबदार िहसक आंदोलनाच्या घटनांमुळे कार्यालये बंद पडल्यास त्या भागातील वीजसेवेची कामेही ठप्प होऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व मारहाणीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे विविध ठिकाणी वीजसेवेबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.