विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करण्यासाठी लांबलचक लाकडी शिडी घेऊन जाण्याची आता गरज नाही. कारण ‘महावितरण’च्या लघु प्रशिक्षण केंद्रामध्ये अगदी पिशवीत नेऊ शकणाऱ्या घडीच्या शिडीची निर्मिती करण्यात आली असून, वीज खांबावर चढण्यासाठी आता या शिडीचाही वापर होणार आहे.
वीजयंत्रणेत बिघाड निर्माण झाल्यास वीज कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढावे लागते. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात वीजखांबावर चढणे अतिशय जीकिरीचे असते. सुमारे २० फूट लांबीची लाकडी शिडी शहरी भागात चारचाकी गाडीतून, तर ग्रामीण भागात अक्षरश: दुचाकीवरून वाहून न्यावी लागते. त्यावर उपाय म्हणून ‘महावितरण’च्या जनमित्रांसाठी एचडीपी पाईप व सुमारे दोनशे फूट जाड सुताच्या दोरीचा वापर करून २० फूट लांबीची घडीची शिडी तयार करण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी अगदी सुलभ असणाऱ्या या शिडीली १ फूट उंचीच्या १८ पायऱ्या असून, ही शिडी सुमारे १२५ किलो वजन पेलू शकणार आहे. विजेच्या खांबावर ही शिडी लावण्यासाठी डीओ ऑपरेटिंग रॉडचा वापर करण्यात आला आहे. शिडीच्या टोकाला असलेला लोखंडी हूक या रॉडच्या साहाय्याने वीजखांबाला अडकविल्यानंतर शिडीवरून सहजपणे खांबावर चढता येते. शिडीच्या टोकावर असलेला एक वेगळा दोर कंबरेला बांधून जनमित्र सुरक्षितपणे वीजखांबावर चढू शकतात. ही शिडी एका पिशवीमधूनही नेता येऊ शकते. लाकडी शिडीच्या वाहतुकीमध्ये येणारे अडथळे व त्यामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये होणारा विलंब या घडीच्या शिडीमुळे दूर होऊ शकणार आहे.
पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर, प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक चंद्रशेखर येरमे, अधीक्षक अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक मनोहर कोलते यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ भगवान खाडे यांच्या सहकार्याने या शिडीची निर्मिती केली आहे.