पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादीने नगरसेवक महेश लांडगे यांना उमेदवारी दिली असून सोमवारी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे सात मार्चला निवडणुकीची औपचारिकता पार पडणार आहे. पदांच्या बाबतीत गेल्या १२ वर्षांपासून लांडगेंना सातत्याने हुलकावणी मिळत होती. तथापि, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनावर घेतल्याने त्यांना न्याय मिळाला आहे. सर्वाचा विरोध डावलून तसेच कोणाचीही शिफारस नसताना अजितदादांनी लांडगेंना  ‘लाखमोलाचे’ अध्यक्षपद दिले आहे.
अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. निर्धारित मुदतीत लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तथापि, लांडगे यांना सुखासुखी अध्यक्षपद मिळू नये, अशी इच्छा असणाऱ्या नेत्यांनी सुनीता वाघेरे यांचाही अर्ज भरून ठेवा, असा आग्रह धरला होता. तथापि, त्यामागची खेळी ओळखल्याने अजितदादांनी त्यास नकार दिला व लांडगेंचा एकमेव अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सगळ्या गटातटांचा व विधानसभा मतदारसंघांचा समतोल राखून अजितदादांनी सदस्यांची निवड केली होती. तेव्हा स्थानिक नेत्यांनी सुचवलेली नावे बाजूला ठेवली होती. समितीतील नावे पाहता अध्यक्षपदासाठी अजितदादांच्या मनात लांडगे यांचेच नाव होते. लांडगे यांच्याबरोबर अध्यक्षपदाची स्पर्धा होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतली, हे आज स्पष्ट झाले. १६ सदस्यांच्या समितीत राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत असून विरोधकांचे अस्तित्व नावापुरते आहे. त्यामुळे शुक्रवारी लांडगे यांची बिनविरोध निवड होणार आहे. भोसरीतील आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांच्याकडे महापौरपद असतानाच भोसरीतील लांडगे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. एकाच गावात दोन मोठी पदे देऊन अजितदादांनी स्वत:च निर्माण केलेल्या नियमाला फाटा दिला आहे.