पुणे : दारू पिऊन त्रास देत असल्याने मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करुन खून केल्याची घटना सोमवारी सकाळी बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली.
प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २४, रा. गणेशनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनितेक दत्तात्रय नवले (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिकेत सख्खे भाऊन आहेत. दोघे बिबवेवाडी भागात राहायला आहेत. प्रवीणला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदे करत नव्हता.
दारूसाठी पैसे मागून तो कुटुंबीयांना त्रास द्यायचा. सोमवारी (१४ जुलै) सकाळी प्रवीणला अनिकेत समाजावून सांगण्यासाठी गेला होता. दारू पिऊन कुटुंबीयंना त्रास देऊ नको, असे त्याने प्रवीणला सांगितले. प्रवीणने मोठा भाऊ अनिकेत याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली. अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार केले.
गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता, असे डाॅक्टरांनी सांगितले. आरोपी अनिकेतला अटक करण्यात आली असल्याची माहिती बिबवेवाडी पोलीस टाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली.