पुणे : अक्षय तृतीयेसाठी फळबाजारात कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाली. आवक वाढल्याने किरकोळ बाजारात आंबा दरात घट झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार हापूस आंब्याचा एक डझनाचा दर सातशे ते बाराशे रुपये असा आहे. ग्राहकांकडून तयार आंब्यांना मोठी मागणी आहे.
अक्षय तृतीया मंगळवारी आहे. अक्षय तृतीयेला पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आंब्याला मोठी मागणी असते. यंदाच्या हंगामात हवामान बदलामुळे आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे आंब्याच्या पहिला बहरात आंब्यांची आवक नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणावर झाली. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणातून आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे आंब्यांच्या दरात काहीशी घट झाली आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात सोमवारी कोकणातून १५ ते २० हजार पेटय़ा हापूसची आवक झाली. हंगामात पहिल्यांदाच हापूसची उच्चांकी आवक झाली. त्यामुळे दरात घट झाली.
आवक वाढणार अक्षय तृतीयेसाठी बाजारातचांगल्या प्रतीच्या हापूसची आवक बाजारात होत आहे. यापुढील काळात आंब्यांची आवक वाढणार असून दरातही घट होण्याची शक्यता आहे, असे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरिवद मोरे यांनी सांगितले.
तयार आंब्यांचा तुटवडा
शनिवारी साप्ताहिक सुट्टी आणि एक मे रोजी असलेल्या सुट्टीमुळे दोन दिवस मार्केट यार्डातील फळबाजार बंद होता. अक्षय तृतीयेला आंब्याला असणारी मागणी विचारात घेऊन कोकणातील शेतकऱ्यांनी बाजारात पेटय़ा पाठविल्या होत्या. सोमवारी बाजाराचे कामकाज सुरू झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांत बाजारात साधारणपणे २५ ते ३० हजार पेटींची आवक झाली आहे. आंबा हंगामातील उच्चांकी आवक आहे. तयार आंब्यांना मागणी असून त्यांचा तुटवडा जाणवत आहे, असे आंबा व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.
पेटीपेक्षा एक ते दोन डझनाच्या खोक्यांना पसंती
आंब्याच्या पेटीपेक्षा ग्राहकांकडून एक ते दोन डझन आंब्याच्या खोक्यांना मागणी आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांकी आवक आहे. अक्षय तृतीयेमुळे आंब्यांना चांगली मागणी असल्याचे आंबा व्यापारी युवराज काची यांनी नमूद केले.