नयना पुजारी खून खटल्यातील आरोपी योगेश राऊतला पळून जाण्यामध्ये मदत केल्याच्या आरोपावरून त्याचा भाऊ मनोज अशोक राऊत (वय २८, रा. गोलेगाव, ता. खेड) याला दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्य़ात पोलिसांनी कट रचणे हे कलम वाढविले आहे.
योगेश हा राऊतचा लहान भाऊ आहे. त्याने योगेश राऊतला पळून जाण्याच्या कटामध्ये मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी अटक करण्यात आली आहे. गुन्ह्य़ात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत हा पळून जाण्याच्या अगोदर मनोज हा त्याला कारागृह आणि न्यायालयात भेटला होता. त्या वेळीच त्याने पळून जाण्याचा कट रचला. राऊतला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या वेळी मनोज याने त्याची मोटारसाकलची एक चावी राऊतला दिली, तर दुसरी स्वत: जवळ ठेवली. पळून जाणार होता, त्या दिवशी ती मोटारसायकल ससून रुग्णालयाच्या खाली लावली होती. लघुशंकेला जाण्याचा बहाणा करत राऊत हा ससूनमधून पळाला. त्या वेळी मनोज व त्याचा एक मित्र रुग्णालयाच्या बाहेर होते. त्यांनी कपडे, एक पिशवी आणि अकरा हजार रुपये त्याला दिले. त्या मोटारसायकलवरून तो हडपसपर्यंत गेला. तेथून दौंडला, त्यानंतर रेल्वेने पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अमृतसर येथून त्याने मनोजशी संपर्क साधल्याचे तपासात पुढे आले. अमृतसरहून तो नंतर दिल्लीला आला होता. दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी राऊतला शिर्डीहून अटक केली होती. त्याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या भावालाही न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.