scorecardresearch

कचरा व्यवस्थापन धोरणात अनेक त्रुटी

शहरातील घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात महापालिकेने केलेल्या धोरणामध्ये काही त्रुटी आहेत.

कचरा व्यवस्थापन धोरणात अनेक त्रुटी
शहरातील घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात महापालिकेने केलेल्या धोरणामध्ये काही त्रुटी आहेत.

सजग नागरिक मंचाच्या चर्चासत्रात तज्ज्ञांची माहिती

शहरातील घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात महापालिकेने केलेल्या धोरणामध्ये काही त्रुटी आहेत. आधी उपविधी आणि नंतर धोरण असा प्रकार महापालिकेने अवलंबिला आहे. नागरिकांच्या हितापेक्षा कंत्राटदारांचे हित जपण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरु असून धोरणाचा उद्देशही स्पष्ट नसल्याची टीका घनकचरा व्यवस्थापन चर्चासत्रात शहरातील तज्ज्ञांनी केली.

शहरातील घनकचरा व्यवस्थापन हा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने बृहत आराखडा केला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा संकलन आणि वाहतूक, कचरा प्रक्रिया तसेच कचरा डेपो याबाबतच्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्याच्या योजनांसंदर्भात हा आराखडा असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. या प्रस्तावित धोरणावर चर्चा करण्यासाठी सजग नागरिक मंचाकडून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मेजर जनरल (निवृत्त) सुधीर जठार, स्वच्छ संस्थेच्या लक्ष्मीनारायण, हर्षद बर्डे, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी या वेळी उपस्थित होते. प्रस्तावित धोरणाचा ऊहापोह करताना जठार यांनी या धोरणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

‘या धोरणाचा उद्देश स्पष्ट नाही. त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची याचा कोणताही उल्लेख नाही. धोरणातील माहितीचा स्त्रोत कोणता, याची कोणताही माहिती नाही. सल्लागाराच्या मदतीने हे धोरण करण्यात आले आहे. समांतर कचरा संकलन व्यवस्थेचा समावेश करून पुणेकरांची यामध्ये दिशाभूल करण्यात आली आहे. छोटय़ा स्वरुपाच्या कचरा निर्मूलन प्रकल्पांच्या बीज बिलाचा भरुदड नागरिकांवर टाकण्यात आला आहे. कचरा गोळा करण्यासाठी देण्यात येणारे शुल्क यात दाखवितण्यात आले आहे. प्रकल्पचालकांकडून भुईभाडेही महापालिकेकडून आकारण्यात येत नाही.  प्रकल्प चालकांचा फायदा व्हावा यासाठी कचरा वर्गीकरण महापालिकेकडून योग्य स्वरूपात केले जात नसल्याचे, जठार यांनी स्पष्ट केले.

‘स्वच्छ’चे हर्षद बर्डे म्हणाले, की ‘स्वच्छ’ या संस्थेमार्फत ओला आणि सुका कचरा संकलित केला जातो. शहरासाठी कचरा गोळा करण्यासाठीचे एकच मॉडेल असणे आवश्यक आहे. घंटागाडय़ांकरिता संकलित होणारा कचरा हा वर्गीकृत नाही. सल्लागारांच्या सांगण्यावरून तो वर्गीकृत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. त्यामुळे घंटागाडय़ांकरवी कचरा संकलन करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

‘कचरा निर्मूलन ही जबाबदारी महापालिकेबरोबरच नागरिकांचीही आहे. त्यासाठी व्यवस्थित स्वरुपात प्रयत्न होणे अपेक्षित आहे. काही झोपडपट्टय़ांमध्येही कचरा निर्मूलन प्रकल्प यशस्वी सुरु आहेत,’ असे लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक वेलणकर यांनी केले. जुगल राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2017 at 04:29 IST

संबंधित बातम्या