आशा डायनिंग हॉल
कोकणी, कारवारी, अस्सल महाराष्ट्रीयन अशा वेगवेगळ्या चवींचा अनुभव घ्यायचा असेल आणि मुख्य म्हणजे पूर्ण भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर आशा डायनिंग हॉलमध्ये आवर्जून जा. इथला एकही पदार्थ मसालेदार, जळजळीत, तिखट किंवा भरपूर तेल वगैरे घालून केलेला नसतो आणि तरीही प्रत्येक पदार्थ चविष्ट असतो. चविष्ट पदार्थाचं सुग्रास भोजन ही इथली खासियत..
पुण्यातल्या ज्या डायनिंग हॉलना खूप जुनी परंपरा आहे, त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे आपटे रस्त्यावरचा आशा डायनिंग हॉल. या डायनिंग हॉलची अडुसष्ट वर्षांची वाटचाल येत्या १५ ऑगस्टला पूर्ण होईल. या व्यवसायाचे जनक रामराव किणी यांची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे आणि भोजनासाठी येणाऱ्यांचीही तिसरी पिढी इथे आता नियमितपणे येत आहे. तुम्ही इथे कधीही गेलात तरी चविष्ट आणि सात्त्विक जेवणाचाच अनुभव तुम्हाला येईल. घडीच्या आणि अगदी तव्यावरून आलेल्या गरम गरम पोळ्या, एक उसळ, एक रस्सा किंवा सुकी भाजी, बटाटय़ाच्या काचऱ्या, आमटी, रस्सम, कोशिंबीर, चटणी, लोणचं, घट्ट दह्य़ाची वाटी, पापड आणि उत्तम प्रतीच्या तांदळाचा भात हा इथला रोजचा मेन्यू. अर्थात त्यातही वैविध्य असतंच. दर रविवारी नेहमीच्याच दरात मसालेभात, आळूची भाजी, उकडलेल्या बटाटय़ाची भाजी, केळ्याची कोशिंबीर आदी पदार्थ दिले जातात. शिवाय, किणी यांच्या घराण्याची खासियत जपणारी मुगाची उसळ आणि डाळीतोंयचा बेत इथे गुरुवारी असतो. पोटभर जेवायचं आणि तृप्त होऊन बाहेर पडायचं असा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येकाला मिळतो.
तेलाचा किंवा तिखटाचा किंवा मसाल्यांचा सढळ वापर नसतानाही इथल्या भाज्या, उसळी आदी सगळेच पदार्थ चवीची खासियत जपणारे असतात. चिंच-गुळाची आमटी हे आशा डायनिंग हॉलचं वैशिष्टय़. खास तेवढय़ासाठी इथे येणारी कितीतरी कुटुंब आहेत. गरम गरम पोळीनी तुम्ही इथे जेवायला सुरुवात करता. जेवण सुरू असताना वाढपी मंडळींची तत्परता आणि पदार्थ आग्रहानं वाढण्याचं आतिथ्यही इथे अनुभवता येतं. इथली स्वच्छता, टापटीप लक्षणीय आणि जुनी छायाचित्र हे वेगळेपण. महापालिकेतील निवृत्त अधिकारी माधव निंबाळकर हे १९६० पासून आणि कॅप्टन (निवृत्त) मधुकर भाटवडेकर हे १९८२ पासून इथे रोज येणारे ज्येष्ठ अधिकारी.
पदार्थ उत्तम प्रतीचे व्हावेत, त्यांची चव टिकून राहावी म्हणून वेगवेगळ्या घरगुती मसाल्यांचा जो ‘फॉम्र्युला’ पहिल्यापासून ठरलेला आहे त्याच पूर्वीच्या पद्धतीनं पदार्थ तयार केले जातात. गोडा किंवा गरम मसाला विकत न घेता ते इथेच तयार केले जातात. हळद, तिखटही दळून घेतलं जातं. गहू, तांदूळ किंवा भाज्या या सगळ्याची खरेदी करतानाही दरांकडे बघितलं जात नाही. त्यामुळेच चवीचा खराखुरा आनंद इथे येणाऱ्या प्रत्येकालाच मिळतो. ही मंडळी कोकण-कारवारकडची असल्यामुळे प्रत्येक पदार्थात नारळाचा सढळ वापर होतो. शिवाय सर्व स्वयंपाक पितळेच्या भांडय़ांमध्ये केला जातो. ती परंपराही इथे टिकून आहे.
कारवार जवळच्या होन्नावर इथे राहणारे रामराव केशव किणी यांनी १९४९ साली ‘मंथली मेस’ या स्वरूपात या व्यवसायाची सुरुवात केली. रामराव पुण्यात आले होते ते चरितार्थासाठी. सुरुवातीला काही घरांमध्ये त्यांनी गडी, स्वयंपाकी म्हणून कामं केली. पुढे फग्र्युसन महाविद्यालयाच्या मेसमध्ये वेटर म्हणूनही त्यांनी काम केलं. ते काम करताना ते स्वयंपाक शिकले. मुळात किणी, कामत, पै, शानबाग ही घराणी हॉटेल व्यवसायातील. रामरावांमध्येही स्वयंपाकाचं कौशल्य आलं आणि कमला नेहरू पार्कजवळ त्यांनी ‘रेग्युलर बोर्डिग हाऊस’ सुरू केलं. चार-पाच वर्षांचा हा अनुभव गाठीशी जमा झाला आणि त्यातूनच किणी यांनी आपटे रस्त्यावर आशा बोर्डिग हाऊस सुरू केलं. या खाणावळीचं रूपांतर पुढे रामरावांचे पुत्र प्रकाश यांनी १९८७ मध्ये आशा डायनिंग हॉलमध्ये केलं.
किणी कुटुंबीय अगदी एकोप्याने हा व्यवसाय सांभाळतात. स्वत: प्रकाश किणी पाककुशल आहेत. ते, त्यांचा पुत्र अरुण, थोरले बंधू सुरेश तसंच किणी कुटुंबीयांची दिनकर शानबाग, विठ्ठलदास शानबाग ही नातेवाईक मंडळी असे सगळे इथे येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेत असतात.
कोणाच्या ताटात काही कमी दिसलं तर लगेच तो पदार्थ वाढायला ही मंडळी स्वत: येतात. इथे येणाऱ्यांनी इतरांकडे इथल्या जेवणाचं कौतुक केलं तर ते खरं समाधान, हा इथला परिपाठ आहे. हा डायनिंग हॉल असला तरी इथला कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्यासारखा असतो. इथलं जेवण उरकण्यासाठी नसतं तर ते आनंद घेण्यासाठी असतं.
कुठे आहे ? : १२२४ धनराज सोसायटी, आपटे रस्ता
दूरभाष: २५५३२४२४
कधी ?
सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच
सायंकाळी साडेसात ते रात्री दहा