पावसाळी पोशाखाची म्हणजेच रेनकोट्सची बाजारपेठ सध्या फुलली आहे. यात पारदर्शक रेनकोटपासून टीशर्टसारख्या दिसणाऱ्या जॅकेट्सची चलती आहे. अगदी जाडजूड कापडापासून ते फॅशनभोक्त तरूण-तरुणींना आवडेल अशा रेनकोट्सना उठाव आहे. दरवर्षी रेनकोट्सचा बाजार कोटय़वधींची उलाढाल करतो. रेनकोटधारी श्वानपालक आणि त्यांचा पावसात भिजणारा उघडाबंब कुत्रा हे अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंतचे आपल्या सोसायटी किंवा घरपरिसरात पाहिलेले चित्र गेल्या काही वर्षांत पूर्णपणे बदलले आहे. आता रेनकोट ही घरातील श्वानाचीही प्राथमिक गरज झाली आहे. पेट इन्डस्ट्रीमधील या मोसमी बाजारपेठेत रेनकोट्स, शूज यांची चलती आहे. त्याचबरोबर छत्री जोडलेले पट्टे हे देखील प्राणिपालकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पावसात भिजून घरात आल्यानंतर कुत्र्यांना पुसण्याचे आणि घरात बागडण्यापासून रोखायचे कष्ट या रेनकोटमुळे वाचले. धो धो पडणाऱ्या पावसामुळे बाहेर फिरण्यासाठी बुट्टी मारण्याचे कारणही या रेनकोटमुळे संपले. बाजारपेठेने हा ट्रेंड रुजवला तो फॅशन इन्डस्ट्रीशी जोडून. मुळात श्वान किंवा पाळीव प्राणी हा देखील गेल्या काही वर्षांपासून फॅशन इन्डस्ट्रीचा भाग झाला आहे. पर्समध्ये ठेवलेल्या चिव्हावा किंवा इतर ‘टॉय डॉग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रजातींचा ट्रेंड वर्षांनुवर्षे जागतिक फॅशन शोमध्ये कायम आहे. त्याला जोडूनच प्राण्यांच्या सजावटीच्या ट्रेंडचा शिरकाव झाला. श्वानांच्या रेनकोट्समध्ये दिसून येणारे वैविध्य हे याचेच द्योतक.

भारतातील मोठी बाजारपेठ

मुसळधार पावसात कुत्रे भिजले तर काय बिघडते.. हा वादाचा किंवा संशोधनाचा विषय असू शकतो. पण आपल्यासाठी जे जे आहे ते सर्व प्राण्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या असोशीतून दर मोसमागणिक पेट इन्डस्ट्रीही नव्या लाटेवर स्वार असते. सध्या बाजारात कुत्र्यांसाठी रंगीबेरंगी रेनकोट्स उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळी डिझाईन्स, आकर्षक रंग असलेले हे रेनकोट्स पालकांना भुरळ घालत आहेत. प्रत्येक प्रजातीनुसार आणि श्वानाच्या आकारमानानुसार रेनकोट्स उपलब्ध आहेत. माणसांसाठी उपलब्ध असलेल्या ‘पोंचू’शी साधम्र्य असलेले, कोट्स स्वरूपात हे रेनकोट्स मिळतात. त्याचबरोबर पावसाळ्यासाठीचे शूजही उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी रेनकोट आणि शूज घालून पावसात मालकाबरोबर बागडणारा श्वान दिसल्यास आता आश्चर्य वाटू नये इतके प्राणिपालकही या नव्या ट्रेंड्सना सरावले आहेत. यंदा प्राणी पालकांच्या पसंतीस उतरले आहेत ते छत्री असलेले पट्टे (हार्नेस) किंवा प्राण्यांसाठी तयार केलेल्या छत्र्या. श्वानाच्या पोटाला बांधण्याच्या पट्टय़ालाच पारदर्शक छत्री जोडलेली असते आणि त्याच्यावर साखळी असते.

ऑनलाईन बाजारपेठेची धडक

जगाच्या कानाकोपऱ्यात दाखल झालेल्या उत्पादनाची तत्काळ उपलब्धता, पर्याय, विविधता यांमुळे प्राणी पालकांचा ओढा आता ऑनलाईन बाजाराकडे आहे. साधारण २० ते ३० संकेतस्थळे फक्त प्राण्यांच्या उत्पादनांची विक्री करतात. त्याचबरोबर ऑनलाईन खरेदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या संकेतस्थळांवरही पाळीव प्राण्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. सध्या पाळीव प्राण्यांचे रेनकोट्स, शूज, छत्र्या, केसातील पावसाचे पाणी काढून टाकण्यासाठीचे ब्रश अशा विविध उत्पानांवर सवलतींची लालूचही ग्राहकांना दाखवली जात आहे. श्वानांच्या आकारानुसार त्यांचे रेनकोट्स किंवा शूजच्या किमती अवलंबून असतात. साधारण साडेचारशे रुपये ते अडीच हजार रुपयांपर्यंत रेनकोट्सच्या आणि तीनशे रुपयांपासून पुढे शूजच्या किमती आहेत. नव्याने दाखल झालेल्या छत्र्या साधारण सहाशे रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. कुत्र्याने काही खाऊ नये म्हणून त्यांचे तोंड झाकणारे ‘मझल्स’ साधारण दिडशे रुपयांपासून उपलब्ध आहेत.