‘त्या’ला कमीत कमी वेळात पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आहे. तीसुद्धा कुठल्या वाहनाने नव्हे, तर अक्षरश: धावत. त्यासाठी तो २८ जुलैपासून धावतो आहे. इंग्लंड आणि युरोप असा एकूण तब्बल ४३३१ मैलांचा प्रवास पूर्ण करून बुधवारी तो पुण्यात पोहोचला. ही कहाणी आहे मूळचे इंग्लंडचे असणाऱ्या केविन कार यांची.
केविन यांना ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ‘फास्टेस्ट सर्कमनॅव्हिगेशन ऑफ द वर्ल्ड बाय फूट’ (पायी प्रवास करत पृथ्वी पालथी घालणारा सर्वात वेगवान माणूस) हा किताब मिळवायचा आहे. त्यांना या आधी ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ धावण्याचा अनुभव आहे. जगाचा २७ देशांचा हा प्रवास १९ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असून भारतातील ८२४ मैल पार केल्यानंतर ते पुढे ऑस्ट्रेलियात जाणार आहेत. तिथून न्यूझीलंड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका पालथी घालून ते कासाब्लँका आणि लिस्बनमार्गे घरी परतणार आहेत. हा एकूण प्रवास सुमारे १८ हजार मैलांचा असणार आहे.
केविन आपल्या प्रवासादरम्यान अधूनमधून ‘ट्विट’ करून आपले अनुभव प्रकट करत आहेत. ‘भारतातील वाहतूक ‘क्रेझी’ आहे; तुम्हाला या वाहतुकीशी जुळवून घ्यावेच लागते. भारतात तापमानही खूपच जास्त असून अशा वातावरणात धावणे आव्हानात्मक आहे,’ असे त्यांनी ट्विट केले आहे.