नांदेडपासून ८० किलोमीटर अंतरावरील सगरोळी या गावात ‘संस्कृती संवर्धन मंडळ’ या सामाजिक संस्थेमध्ये संस्कृती संवर्धनाबरोबरच मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद केशवराव देशमुख यांना काल पुण्यात मराठवाडा समन्वय समितीतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. या निमित्ताने श्रीराम ओक यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

आपल्याला सामाजिक कार्याचा वारसा कोणाकडून आणि कसा मिळाला?

– सगरोळीतील शैक्षणिक-सामाजिक कार्याची सुरुवात वडिलांपासून म्हणजेच बाबासाहेबांपासून झाली. माझे आजोबा नारायणराव यांचाही निष्पक्ष न्यायदानाबद्दल सगरोळी परिसरात लौकिक होता. बाबांच्या आजी राधाबाई या सगरोळी परिसरातील गोरगरीब, तसेच गरजूंसाठी कायमच आधारस्तंभ म्हणून उभ्या होत्या. वडील तरुणपणापासूनच चळवळे आणि सुधारक वृत्तीचे होते. या गावाला ऐतिहासिक महत्त्व असून, सावरवल्ली असे पूर्वी गावाचे नाव होते. सगरोळीत वडिलांच्या कार्यावर रझाकारांची वक्रदृष्टी होती. त्यामुळे आमच्या कुटुंबाला अतोनात हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागले. त्यामुळे कुटुंबाला बेळगावमध्ये स्थलांतरितही व्हावे लागले होते. तेथे वडिलांच्या सुधारक दृष्टीला पोषक वातावरण मिळाले आणि त्यातून त्यांच्यात सामाजिक कार्याची प्रगल्भता आली. पुढे त्यांनी ही सामाजिक संस्था स्थापन केली. साठच्या दशकात संस्था स्थापनेनंतर ते सामाजिक कार्यात अधिकाधिक व्यग्र झाले. मी थोडासा उशिरानेच सामाजिक कार्यात आलो. मी आधी सरकारी नोकरीसाठी इच्छुक होतो. पण, वडिलांचे कार्य पाहून या कार्यात आलो. १९५९ मध्ये स्थापन झालेल्या एका निवासी शाळेचे स्वरूप मी यथाशक्ती बदलून त्याला बहुआयामी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पुढे लग्नानंतर पत्नी सुनंदानेही माझ्याबरोबर सामाजिक कार्यात स्वतःला सहभागी करून घेतले.

गावातील मुलांचा शैक्षणिक, तसेच कौशल्याधारित विकास व्हावा म्हणून करत असलेल्या गोष्टी कोणत्या?

– ग्रामीण भागातील शिक्षण हे केवळ साक्षरतेपुरते मर्यादित न ठेवता त्यातून एक कुशल व्यक्ती समाजास देणे आवश्यक असल्याचे मला जाणवले आणि त्या दृष्टीने मी विविध योजनांची आखणी केली. यासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग घेतला. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करीत असताना तंत्रज्ञानाबरोबरच आर्थिक साहाय्य पुरविणे हे मी गेली ३० वर्षे करतो आहे. त्यामध्ये नियमित शाळेबरोबरच अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शालेय वेळांव्यतिरिक्त वर्ग सुरू केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आम्ही शिष्यवृत्ती सुरू केली. पुस्तकातील विज्ञान वास्तवात अनुभवता यावे, यासाठी डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स पार्कची आम्ही उभारणी केली. मुलांना खेळातून शिक्षण मिळावे यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टाॅय बँक उपलब्ध केली. पुस्तकातील संकल्पना बारकाईने अभ्यासण्यासाठी ‘ग्राममंगल प्रकल्प’ हा कृतिशील उपक्रम राबवतो. ग्रामीण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे म्हणूनही प्रयत्नशील असतो. याशिवाय माध्यमिक विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण, बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, तसेच समाजातील अनाथ, निराधार, निराश्रित २५० मुला-मुलींचे संगोपन ते पुनर्वसनही आमच्या संस्थेमार्फत केले जाते. तसेच, भाषासुधार प्रकल्प, वाचन-लेखन कार्य, कलाविकास प्रकल्प, केशव व्याख्यानमाला आदी उपक्रम आणि संकुलातील सर्व अध्यापकांना प्रशिक्षित करण्याचे कार्यही केले जाते.

गावासाठी कृषी क्षेत्रात कोणते उपक्रम राबवलेत?

– ग्रामीण भागात सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाते. माती परीक्षणासाठी फिरत्या प्रयोगशाळेद्वारे बांधावरील मातीचे परीक्षण, तसेच मोफत पीक सल्ला दिला जातो. लुप्त होत चाललेल्या अनेक देशी बी-बियाण्यांचे जतन, संवर्धन, प्रचार-प्रसार केला जातो. आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी रब्बी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. कृषी क्षेत्रातील आधुनिक प्रयोगाचे सादरीकरण कृषी तंत्रज्ञान महोत्सवातून केले जाते.

जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी काय सांगाल?

– ग्रामीण भागातील शेतकरी तथा सामान्य व्यक्तीला पाण्याचे महत्त्व पटावे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर व्हावा, त्यातून व्यक्तीची, तसेच समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘नाबार्ड’सारख्या विविध संस्थांच्या सहकार्याने फक्त जिल्ह्यातीलच नाही, तर मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये जलसाक्षरतेचे कार्य केले. शिवाय गावांच्या गरजा ओळखून नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण, पडीक गायरान जमिनीवर वृक्षारोपण, वनराई बंधारा, औषधी वनस्पतींची लागवड आदी उपक्रम राबवले आहेत. जीवनात पाण्याचे जसे महत्त्व आहे, तसेच शिक्षण आणि कौशल्य यांचीही जगण्यासाठी गरज असते. उद्याच्या पिढीत ते विकसित व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते आणि भविष्यातही राहतील. shriram.oak@expressindia.com