पुणे : स्टेशनरी साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणपत्रिकांची छपाई रखडली आहे. विद्यापीठाच्या लालफितीच्या कारभारामुळे स्टेशनरीची खरेदी रखडली असून, गुणपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

विद्यापीठाकडून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिले जाणे आवश्यक होते. पूर्वी विद्यापीठ बाह्य यंत्रणेकडून गुणपत्रिकांची छपाई करून घेतली जात होती. मात्र दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने स्वत:च गुणपत्रिकांच्या छपाईची यंत्रणा निर्माण केली.

तर सेवा पुरवठादाराकडून स्टेशनरी उपलब्ध करून घेऊन विद्यापीठाच्या पातळीवर गुणपत्रिकांच्या छपाईचे काम करण्यात येते. मात्र या स्टेशनरी साहित्य उपलब्ध नसल्यामुळे गुणपत्रिकांची छपाई लांबणीवर पडली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे अद्यापही स्टेशनरीची खरेदी करण्यात आलेली नाही. स्टेशनरीची तात्पुरती व्यवस्था करून छपाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठातील लालफितीच्या कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. युक्रांदचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले, की विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वेळेत मिळणे आवश्यक असते. त्यावर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य अवलंबून असते. मात्र विद्यापीठाकडून गुणपत्रिका वेळेत न मिळाल्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गुणपत्रिका मिळण्याबाबत कुलगुरूंची भेट घेऊन, विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही. त्यामुळे गुणपत्रिकांसाठी आता आंदोलन करावे लागेल.