पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद आणि चाकण येथील दोन अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर वाहिन्यांमध्ये बुधवारी (९ फेब्रुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने वीजसंकट निर्माण झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, लोणीकंद वाघोली आदी भागातील तब्बल २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यातील काही भागामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी १२ या वेळेत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. काही भागांमध्ये दुपारी तीननंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. एकाच वेळी मोठय़ा विभागाचा वीजपुरवठा खंडित होण्याची ही गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना ठरली. वीजबंदमुळे शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. पाणीपुरवठय़ावरही वीजबंदचा परिणाम झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  महापारेषणच्या लोणीकंद ते चाकण आणि चाकण ते तळेगाव या दोन्ही टॉवर वाहिनीच्या एकूण ५ सर्किटमध्ये दाट धुके आणि दव यांचा परिणाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. परिणामी  लोणीकंद आणि चाकण या ४०० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या उपकेंद्रांतून महावितरणच्या तब्बल १८९ उपकेंद्रांना होणार वीजपुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे १५ लाख १३ हजार, पिंपरी चिंचवड शहरातील ७ लाख २५ हजार तसेच लोणीकंद, वाघोली, चाकण या ग्रामीण परिसरातील सुमारे १ लाख ८० हजार अशा एकूण २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive power outage in parts of pune pimpri chinchwad zws
First published on: 10-02-2022 at 02:15 IST