महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कलचाचणी २०१८ चा अहवाल शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील सर्वाधिक २१ टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे असल्याचे कलचाचणीतून स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व म्हणजे १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली.

राज्य मंडळातर्फे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत कलचाचणी २०१८ चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, तसेच १५ विद्यार्थ्यांना कलचाचणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करणाऱ्या ‘श्यामची आई फाउंडेशन’च्या शीतल बापट या वेळी उपस्थित होत्या. सन २०१८ या शैक्षणिक वर्षांसाठी घेण्यात आलेल्या कलचाचणीतून राज्यातील सर्वाधिक २१ टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे, १३ टक्के  विद्यार्थ्यांचा कल कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमांकडे आणि १५ टक्के  विद्यार्थ्यांचा कल संरक्षण आणि प्रशासकीय सेवेकडे असल्याचे दिसून आले आहे. कला क्षेत्राकडे ११ टक्के, ललित कला क्षेत्राकडे १८ टक्के, आरोग्य विज्ञान शाखेकडे १२ टक्के आणि तांत्रिक विद्याशाखांकडे १० टक्के विद्यार्थ्यांचा कल असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना त्यातील करिअरच्या पर्यायांविषयी माहिती देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या प्रकल्पाचे एक उत्कृष्ट उपयोजित प्रकल्प म्हणून कौतुक केले आहे आणि देशातील इतर चार राज्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले, परीक्षेला बसताना विद्यार्थ्यांवर निकालाचे किंवा चांगले गुण मिळवण्याचे दडपण असते. कल चाचणीच्या बाबत असे कोणतेही दडपण नाही, हे या चाचणीचे वैशिष्टय़ आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालानंतर नेमके कोणते शिक्षण घ्यावे याबाबतचा संभ्रम असतो, कलचाचणीसारख्या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील तो संभ्रम दूर करण्यास मदत होणार आहे.

निकाल असा पाहा

दहावीच्या परीक्षेच्या बैठक क्रमांकाच्या आधारे विद्यार्थी त्यांचा कलचाचणीचा निकाल पाहू शकणार आहेत. महाकरिअरमित्र या संकेतस्थळावरून हा निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. त्याचबरोबर ज्या विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे, त्या विषयानुरूप त्या क्षेत्रांतील करिअरचे पर्याय या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

कल बदलला

सन २०१७ या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या कलचाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल ललितकला (फाइन आर्ट) या क्षेत्राकडे असल्याचे दिसून आले होते. या वर्षीच्या चाचणीत मात्र सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य विद्याशाखेकडे असल्याचे दिसून आले आहे. या वर्षी ललितकला क्षेत्राकडे १८ टक्के तर वाणिज्य विद्याशाखेकडे २१ टक्के विद्यार्थ्यांचा कल आहे.