अनावश्यक खरेदी थांबविण्याची मागणी

पुणे : कचरा वर्गीकरणासाठी प्लास्टिकचे डबे, कापडी आणि ज्यूट पिशव्या, बाक आदी खरेदीला माजी महापौर संघटनेकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. या वस्तू खरेदीचा प्रस्ताव आयुक्तांनी रद्द करावा आणि संकल्पनांच्या नावाखाली होत असलेली उधळपट्टी थांबविण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.

संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे, बाळासाहेब शिवरकर, अंकुश काकडे, दत्तात्रय धनकवडे, रजनी त्रिभुवन, प्रशांत जगताप यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले. दरम्यान, सभागृहनेता गणेश बीडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही माजी महापौरांची मागणी योग्य असून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही महापालिका प्रशासनाने करावी, असे स्पष्ट केले.

महापालिकेच्या मुख्य सभेने वस्तू खरेदीचा ठराव मंजूर केला आहे. हा खर्च अनावश्यक आहे. त्यामुळे त्याला प्रशासकीय मंजुरी देऊ नये, अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच करोना काळात झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करावे, बिबवेवाडी येथील आण्णा भाऊ साठे नाटय़गृहातील ध्वनिवर्धक चोरी प्रकरणी सुरक्षा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहरामध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी रस्त्यांना नाव देताना फलकाचा रंग, आकार एकसाराखा असावा, असे निवेदन देण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली.