विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच चर्चेत आले होते. सुरुवातीला त्यांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यापार्श्वभूमीवर सोमवारी पुणे महापालिकेत एक मजेशीर किस्सा घडला. त्या २३ नोव्हेंबरच्या पहाटेपासून अजितदादा आम्हाला आमचेच वाटतात असं विधान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महानगरपालिकेमध्ये सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालिका विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि नगरसेविका ज्योत्सना एकबोटे तसेच आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उदघाटनाच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरु असताना अजित पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचा आग्रह स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी चंद्रकांत पाटील आणि माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्याकडे धरला होता. त्यावर दोन्ही दादा आपलेच असून २३ नोव्हेंबरच्या पहाटेपासून अजित दादाही आम्हाला आपलेच वाटतात असं महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानवर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.

राज्याच्या राजकारणात असा झाला होता भूकंप

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये सत्तास्थापनेपूर्वी किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु असताना २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अचानक नवा ट्विस्ट आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यादिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. राजभवनात सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी गुपचूप हा शपथविधी सोहळा पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. मात्र, त्यानंतर चारच दिवसांत हे सरकार कोसळले. कारण, अजित पवार यांना एकाही आमदाराचा पाठिंबा मिळाला नव्हता. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे या सरकारमध्ये अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor of pune says from then ajit pawar seems to be ours aau 85 svk
First published on: 09-03-2020 at 17:48 IST