आपण पुरवलेली औषधे अंतिमत: योग्य व्यक्तीच्याच हाती पडत आहेत ना याची खात्री करण्यासाठी घाऊक औषधविक्रेत्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मेडिकल रीप्रेझेंटेटिव्हने घाऊक औषधविक्रेत्याकडून औषधे घेऊन ती भलत्याच व्यक्तीला विकल्याच्या एका प्रकरणात सदाशिव पेठेतील एका घाऊक औषधविक्रेत्याचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला आहे.
नोव्हेंबरमध्ये एका मेडिकल रीप्रेझेंटेटिव्हने (एमआर) सदाशिव पेठेतील घाऊक औषधविक्रेत्याकडून औषधे खरेदी करून ती भलत्याच व्यक्तीला पुरवल्याचा प्रकार उघड झाला होता. ही औषधे वर्गीकृत म्हणजे ‘शेडय़ूल्ड ड्रग्ज’ होती. या एमआरने कोथरूडमधील एका औषधविक्रेत्याच्या नावावर औषधे घेतली होती. प्रत्यक्षात औषधे कोथरूडच्या विक्रेत्याकडे न पोहोचता परस्पर औषधविक्रीचा परवाना नसलेल्या तिसऱ्याच व्यक्तीला पुरवली गेली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ६ जणांवर प्रथम माहिती अहवालही दाखल करण्यात आला होता. संबंधित घाऊक औषधविक्रेत्याने आपण विकलेली औषधे योग्य व्यक्तीच्या हाती पडली की नाही याची खात्री केली नसल्याचे एफडीएच्या चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात या औषधविक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
औषध विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते म्हणाले, ‘‘ज्याने औषधांची मागणी केली होती त्यालाच औषधे विकली जात आहेत का याकडे औषधविक्रेत्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एखादे औषध कुणाला विकले गेले हेच माहीत नसेल आणि नंतर ते औषध कमी प्रतीचे असल्याचे आढळून आले किंवा त्याचे काही दुष्परिणाम लक्षात आले आले तर औषधाचा माग काढणे अवघड होते. एखाद्या डॉक्टरच्या नावाने औषधांची चिठ्ठी घाऊक विक्रेत्याला द्यायची, डॉक्टरने केलेल्या मागणीची संख्या परस्पर वाढवून अधिक औषधे खरेदी करायची आणि जास्तीची औषधे बाहेर विकायची अशा घटनाही घडू शकतात. गर्भपाताची औषधे अशा प्रकारे विकली जाऊन त्यांचा गैरवापर केला जाऊ शकतो.’’
 नार्कोटिक घटकद्रव्यांचा अंतर्भाव असलेल्या औषधांचाही गैरवापर होण्याची शक्यता असते, याकडे सह आयुक्त बा. रे. मासळ यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘ज्या औषधांचा गैरवापर होऊ शकतो अशा औषधांच्या विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यास एफडीए प्राधान्य देत आहे. औषधविक्रेत्यांच्या तपासणीच्या वेळी एफडीएकडून विक्रेत्यांच्या खरेदी-विक्री बिलांची पडताळणी केली जाते. त्यावरून अशा प्रकारची प्रकरणे उघडकीस येऊ शकतात.’’