पुण्याच्या नव्या विमानतळाचा विषय मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. जुन्या विमानतळासाठी जागेची उपलब्धता तसेच अन्य विषय संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करून सोडवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळ सल्लागार समितीची बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती. सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार शिरोळे, उपाध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, समितीचे संचालक मनोज गांगल तसेच महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, मराठा चेंबर आणि हवाई वाहतूक कंपन्या आदींचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी विमानतळाशी संबंधित कोणती नवी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत याचे सादरीकरण करण्यात आले.
नव्या विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाणार असल्याचे सांगून खासदार शिरोळे म्हणाले की, जुन्या विमानतळाच्या जागेसंबंधीचे प्रश्न संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करून सोडवले जातील. नवे हवाई वाहतूक मार्ग सुरू करण्याबाबतही केंद्रीय मंत्री गजपती राजू यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली जाईल. विमानतळावरील विकासकामांचाही सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.
विमानतळ सल्लागार समितीची बैठक दर तीन महिन्यांनी बोलावावी, अशी सूचना यावेळी आमदार मुळीक यांनी केली. विमान वाहतुकीत गेल्या वर्षांत पंचवीस टक्के इतकी वाढ झाली असून पुणे विमानतळावरून जाणाऱ्या विमानांची संख्या पन्नासवरून त्रेसष्ट झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.