खासदार वंदना चव्हाण यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : बहुचर्चित नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेसंदर्भात पर्यावरण अभ्यासकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांचे खुलासे करण्यासंदर्भात महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याने आता यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच दाद मागण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात येत्या काही दिवसांत बैठक होणार आहे, अशी माहिती राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी दिली. दरम्यान, मेट्रोमुळे पाषाण- पंचवटी ते कोथरूड या दरम्यानच्या बोगद्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. वेताळ टेकडीच्या परिसरातच सर्व प्रकल्प का आणले जात आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली.

साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठाचे पुनरूज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत एकूण ४४ किलोमीटर लांबीचा नदीकाठ सुशोभीत होणार आहे. नदीचे खोलीकरण, नदीकाठी उद्याने, छोटी मैदाने, जॉगींग ट्रॅक, सायकल मार्ग, विरंगुळा केंद्र अशी कामे याअंतर्गत प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा हा सात किलोमीटर लांबीचा नदीकाठ सार्वजनिक खासगी लोकसहभागातून विकसित केला जाईल. मात्र योजनेच्या प्रारंभापासून पर्यावरणप्रेमी आणि संस्थांनी योजनेबाबत काही आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची १२ मार्च रोजी मुंबई येथे बैठक झाली होती. या बैठकीत योजनेच्या कामांना तात्पुरती स्थगिती देताना जलसंपदा विभागाने संयुक्त बैठक घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले होते.

या बैठकीनंतर महापालिका आणि जलसंपदा विभाग यांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी महापालिका अधिकारी आणि योजनेच्या सल्लागाराला आक्षेपांबाबतचे ठोस खुलासे करता आले नाहीत. त्यामुळे खुलासे करण्यासाठी महापालिकेने सात दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत उलटून दीड महिन्याहून अधिक कालावधी झाल्यानंतरही महापालिकेने अद्यापही त्याबाबचे सादरीकरण स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केलेले नाही. या पार्श्वभूमीवर नदी सुधार योजनेबाबतची भूमिका अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. प्रदीप घुमरे यावेळी उपस्थित होते.

प्रकल्पाला विरोध नाही. मात्र महापालिकेने आक्षेपांचे खुलासे केलेले नाहीत. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्याचे अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, वेताळ टेकडी परिसरातच सर्व महत्त्वाचे प्रकल्प का राबविले जात आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली. कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल आहे. करिष्मा सोसायटी परिसरात उड्डाणपूल प्रस्तावित आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोगदा रस्त्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्याल विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting with the chief minister soon on mula mutha riverfront development project zws
First published on: 13-05-2022 at 04:07 IST