कुपोषणग्रस्त भाग अशीच ओळख झालेल्या मेळघाटात राहणारी आणि खडबडीत मातीवर कायम अनवाणीच चालणे अंगवळणी पडलेली मुले रविवारी चिंचवडमध्ये इतर मुलांबरोबरच स्पर्धेत धावली. कोरकू आदिवासी भागातील ही मुले स्पर्धेत केवळ सहभागी झाली नाहीत, तर उत्तम कामगिरी करत त्यांनी बक्षिसेही मिळवली.
‘रोटरी क्लब ऑफ निगडी- पुणे’ यांच्यातर्फे रविवारी ‘रनथॉन’ या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी धावण्याच्या या स्पर्धेत मेळघाटातील ९ मुले-मुली सहभागी झाली होती आणि तिन्ही विभागांत त्यांनी वरच्या नंबराने स्पर्धा पूर्ण केली आहे.
मेळघाटात काम करणारी ‘मैत्री’ ही संस्था आणि ‘टाटा मोटर्स’मध्ये काम करणारे संस्थेचे काही स्वयंसेवक यांच्यामार्फत ही मुले पुण्यात येऊन गेले दहा दिवस सराव करत होती. संस्थेच्या जयश्री शिदोरे म्हणाल्या, ‘ज्या वेळी मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूंची परिस्थिती खूपच चिंताजनक होती त्या सुमारास जन्माला आलेली ही मुले आहेत. ती चपळ आणि काटक आहेत. मातीवर अनवाणी पळण्याची त्यांना सवय आहे, पण अशा स्पर्धेत धावणे त्यांच्यासाठी काहीसे नवीन होते. त्यासाठीचे प्रशिक्षण, वेगळा दिनक्रम, खुराक या गोष्टींची त्यांना गेल्या आठ दिवसांत ओळख झाली. ट्रॅकसूट व धावण्याचे शूज घालून ती पळायला शिकली आणि इतर मुलांबरोबरच स्पर्धेत उतरली.’
‘संस्थेचे सर्व काम देणगीदारांवरच चालत असून या स्पर्धेसाठी समाज माध्यमांद्वारे देणगीदारांना निधीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनातून या मुलांची सोय करण्यासाठी दहा दिवसांत ६० हजार रुपये जमा झाले. मुलांच्या राहण्याची व प्रशिक्षणाची व्यवस्था टाटा मोटर्समध्ये करण्यात आली होती. तिथे काम करणारे मंगेश जोशी व इतर स्वयंसेवकांनी त्याचे आयोजन केले, तसेच क्रिकेटिअर मिलिंद गुंजाळ यांनीही मदत केली,’ असेही शिदोरे यांनी सांगितले.
कुसुमा मावसकर हिने ५ किमीच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला, तर नीरज बेठेकर व जितेंद्र कासदेकर यांनी ५ किमीमध्ये चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. दहा किमीच्या शर्यतीत अश्विनी मावसकर दुसरी आली. २१ किमी धावण्याच्या स्पर्धेत विनोद ऊके पाचवा, तर शिवलाल बेठेकर दहावा आला.