पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयात एका गतिमंद महिलेवर रुग्णालयाचाच कर्मचारी आणि एका खासगी सुरक्षारक्षकाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली असून त्यांना आज रविवार न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील एका पुर्नवसन केंद्रात राहत असलेल्या पीडित महिलेला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील सुरक्षारक्षकाने व रुग्णालयाच्या कर्मचाऱयाने पीडित महिलेला लिफ्टमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने पुनर्वसन अधिकाऱयास खाणाखुणा करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत संबंधित दोघांना अटक केली.