म्हैसकर मिक्ता पुरस्कार (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवॉर्ड्स) सोहळ्यामध्ये दरवर्षी देण्यात येणारा ‘गर्व महाराष्ट्राचा’ पुरस्कार या वर्षी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि अभिनेता नाना पाटेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मिक्ता २०१३ च्या पुरस्कारांसाठी चित्रपट विभागामध्ये अनुमती, दुनियादारी आणि धग चित्रपटांना आणि नाटक विभागामध्ये गेट वेल सून, प्रपोजल आणि फॅमिली ड्रामा या नाटकांना नामांकन मिळाले आहे. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान मकाऊ येथे होणाऱ्या मिक्ता अंतिम सोहळ्यामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र कलानिधी आयोजित ‘म्हैसकर मिक्ता २०१३’ च्या पहिल्या फेरीचा समारोप रविवारी झाला. यावेळी मिक्ताच्या अंतिम सोहळ्याची नामांकने जाहीर करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, मिक्ताचे मुख्य संयोजक महेश मांजरेकर, सिटी कॉर्पोरेशनचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, कॅलिक्स समूहाचे प्रसाद आपटे, म्हैसकर फाऊंडेशनचे सचिन अवस्थी उपस्थित होते.
चित्रपट विभागामध्ये दिग्दर्शनासाठी संजय जाधव (दुनियादारी), चंद्रकांत कुलकर्णी (आजचा दिवस माझा), शिवाजी पाटील (धग) यांचे नामांकन झाले आहे. उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी अंकुश चौधरी (दुनियादारी), विक्रम गोखले (अनुमती), स्वप्नील जोशी (दुनियादारी), यांना तर उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर (दुनियादारी), उषा जाधव (धग), प्रिया बापट (टाईम प्लीज) यांचे नामांकन झाले आहे. सहायक अभिनेत्यासाठी हृषीकेश जोशी (आजचा दिवस माझा), नागेंद्र भोसले (धग), उपेंद्र लिमये (धग) यांना तर सहायक अभिनेत्रीसाठी सई ताम्हणकर (दुनियादारी), सुलेखा तळवलकर (प्रेमाची गोष्ट) आणि ऊर्मिला कानेटकर (दुनियादारी) यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे.
नाटक विभागामध्ये दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी (गेट वेल सून), प्रपोजल (राजन ताम्हाणे), विजय केंकरे (फॅमिली ड्रामा) यांचे नामांकन झाले आहे. उत्कृष्ट अभिनेता म्हणून संतोष जुवेकर (सुख म्हणजे नक्की काय असते), स्वप्नील जोशी (गेट वेल सून), आस्ताद काळे (प्रपोजल) आणि मोहन जोशी (सुखांत) यांचे तर उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रीमा (एकदा पहावे न करून), अदिती शारंगधर (फॅमिली ड्रामा), सुकन्या कुलकर्णी (प्रपोजल) यांच्यामध्ये स्पर्धा आहे. सहायक अभिनेता म्हणून संदीप मेहता (गेट वेल सून), सागर देशमुख (उणे पुरे शहर एक), देवेंद्र सारळकर (डू अँड मी) यांचे तर सहायक अभिनेत्री म्हणून हेमांगी कवी (ठष्ठ), राधिका आपटे (उणे पुरे शहर एक) आणि राधिका इंगळे (डू अँड मी) यांचे नामांकन करण्यात आले आहे.