सीआयडी मालिका पाहून २ महिने ‘प्लॅन’ केला, पुण्यात ७० वर्षीय महिलेचा खून, अल्पवयीन मुलांना अटक

पुण्यातील हिंगणे खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून एका ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पुण्यातील हिंगणे खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून एका ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील सिंहगड पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक केली आहे. ३० ऑक्टोबरला हिंगणे खुर्द येथील सायली हायलाईट्स अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ७ मध्ये चोरी झाली होती. घरामध्ये वयस्कर महिला जखमी आणि बेशुध्द अवस्थेत सापडली. यानंतर ७० वर्षीय शालिनी बबन सोनवणे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं?

मृतदेह आढळलेल्या घराची पाहणी केल्यावर घरामधील कपाटातील सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम चोरल्याचे आढळले. त्या इमारतीच्या जवळील रोकडोबा मंदिराजवळ लहान मुले खेळत होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी दुपारी पाणी पुरी खायला जाताना त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते, असं सांगितलं.

त्यावर परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असता ते दोघे घाई गडबडीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर दोघा अल्पवयीन आरोपी मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एका मुलाला स्वतःच्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याची माहिती समोर आली. त्याकडे अधिक चौकशी केल्यावर, गुन्ह्याची कबुली दिली.

“सीआयडी मालिका पाहिली आणि चोरी करण्याचं ठरवलं”

आरोपीने पोलिसी खाक्या दिसल्यानंतर गुन्हा कबूल केला आणि ७० वर्षीय शालिनी बबन सोनवणे यांच्या खूनचा घटना क्रम सांगितला. आरोपी म्हणाला, “आमचं शालिनी सोनवणे यांच्या घरात नेहमी येणे-जाणे होते. त्यांच्याकडे कायम खुप पैसे असत, ते पैसे कोठे ठेवतात याबद्दल आम्हाला माहिती होती. पण त्या कुठेच बाहेर जात नव्हत्या. पैसे चोरण्याचा अनेक दिवसांपासून प्लॅन करत होतो. त्याच दरम्यान साधारण २ महिन्यांपूर्वी सीआयडी मालिका पाहिली आणि चोरी करण्याचं ठरवले.”

“हाताचे ठसे कोठे उमटू नये यासाठी हॅण्ड ग्लोजचा वापर”

३० ऑक्टोबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शालिनी सोनवणे यांच्या घरी नेहमीप्रमाणे गेलो. तेव्हा त्या टी. व्ही. पाहत होत्या. तेव्हा आरोपी दोघेही त्यांच्यासोबत टीव्ही पाहत बसले. तेवढ्यात काही समजण्याच्या आतमध्ये शालिनी सोनवणे यांना पाठीमागून खाली ढकलून दिले. त्यानंतर तोंड आणि नाक दाबून खून केला.

हेही वाचा : “पुजाऱ्यानं आधी दारू आणायला सांगितली, मग खोलीत बंद करून…”

तसेच खून करतेवेळी दोघा आरोपींनी सीआयडी मालिकेत दाखवलेल्या दृश्याप्रमाणे आपल्या हाताचे ठसे कोठे उमटू नये यासाठी हॅण्ड ग्लोजचा वापर केला. यानंतर कपाटातील ९३ हजार रोख रक्कम, ६७ हजार ५०० रुपये रकमेचे सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला, अशी कबुली आरोपींनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minor murder of 70 year woman in hingane khurd pune after watching cid series pbs

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?