पोलिसांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या अडचणी सोडविणे आणि विविध गुन्ह्य़ांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी ‘मिशन सेफ’ हाती घेतले आहे. या मिशनअंतर्गत पोलीस ठाण्याचे एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्याद्वारे हद्दीतील नागरिकांशी सुसंवाद साधला जात आहे. पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र वेबसाइटवरून नागरिकांशी संवाद साधणारे कोथरूड हे शहरातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे. 
कोथरूड भागात सर्वात सुशिक्षित आणि माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील व्यक्ती राहतात. त्यांना पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे कोथरूड पोलिसांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे संकेतस्थळ पूर्वीच बनविण्यात आले होते. नागरिकांच्या सोईसाठी या संकेतस्थळाचा वापर करण्याचे योजना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव विधाते यांनी आखली आहे. कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखळी चोरीचे गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, घरफोडी, वाहन चोरी या गुन्ह्य़ाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांशी संपर्क साधून बैठका आयोजित करून त्यांच्यात जनजागृती करणे आवश्यक आहे. परंतु, नोकरी आणि व्यवसायामुळे कोथरूड भागातील नागरिकांना बैठकांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्रके वाटण्यात आली होती. पण, त्याचा म्हणावा असा परिणाम दिसला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या तयार असलेल्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे विधाते यांनी ठरविले.
नागरिकांना माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात यावे लागणार नाही, हे समोर ठेऊन संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाडेकरूंची माहिती, संशयितांचे फोटो, चोरीला गेलेल्या आणि बेवारस वाहनांची माहिती, पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या तारखा, बेवारस मृतदेह, विविध गुन्हे आणि त्याबाबत घ्यायची खबरदारी, गंभीर गुन्ह्य़ाची माहिती, पोलीस चौक्या आणि त्यांचे क्रमांक, अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक अशी माहिती देण्यात आली आहे. त्याच बरोबर सोनसाखळी चोरांच्या लुटण्याच्या पद्धती चित्राच्या साहाय्याने दाखविण्यात आले आहे. ज्या नागरिकांना वेळे अभावी पोलीस ठाण्यात पोहोचणे शक्य नाही त्यांना एक क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. आपल्या परिसरातील वाहतूक समस्या आणि अवैध धंद्यांची माहिती नागरिक ईमेल द्वारे कळवू शकतात. मिरवणूक अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी लागणाऱ्या अर्जाचे नमुने संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मिशन सेफ मध्ये राजकीय प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिक संघांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे. प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंगसाठी फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोथरूड ठाण्याच्या पोलिसांनी दिली.
प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन
कोथरूड पोलीस ठाण्यात प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित केला जातो. पोलीस चौकी पातळीवर ज्या नागरिकांच्या समस्या किंवा अडचणीचे निवारण झाले नाही. त्या सोडविण्यासाठी प्रत्येक शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडाव्यात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. त्याच बरोबर नागरिकांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाचा तपास कोठपर्यंत आला आहे. त्याची सद्य:स्थिती काय आहे याची माहिती या दिवशी दिली जाते. सकाळी दहा ते दुपारी बारा पर्यंत नागरिकांनी येऊन त्यांच्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव विधाते यांनी केले आहे.