शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शाळांच्या सुटय़ांच्या वेळापत्रकामध्ये काही चुका झाल्यामुळे शिक्षकांना यावर्षी काही जोडून येणाऱ्या सुटय़ांना मुकावे लागणार आहे. मात्र, या सुटय़ा घेतल्यास दिवाळीची किंवा उन्हाळी सुटीही कमी करण्याची वेळ येणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षभरात २३७ दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सुटय़ा मुळातच कमी झाल्या आहेत. शिक्षकांना आता रविवार सोडून ७६ दिवसच सुटी घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१४ – २०१५ साठी शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये काही सुटय़ा चुकीच्या दिवशी दाखवण्यात आल्या आहेत. मात्र, आता या सुटय़ा बदलल्या तर ७६ दिवसांचा निकष पूर्ण करण्यासाठी दिवळीची किंवा उन्हाळी सुटी कमी करण्याची वेळ शिक्षण विभागावर येणार आहे.
‘डिसेंबर २०१४ मध्ये बकरी ईद ची सुटी शिक्षण विभागाने रविवारी ५ ऑक्टोबरला दाखवली आहे. मात्र, राज्य शासनाने ही सुटी सोमवारी ६ ऑक्टोबरला घेतली आहे. त्याचप्रमाणे २ मे ते १३ जून अशी उन्हाळी सुटी दाखवण्यात आली आहे. ही सुटी ३८ दिवस असल्याचे शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सुटी ३७ दिवसांची आहे. आयुक्तांच्या आणि मुख्याध्यापकांच्या अखत्यारीतील दोन सुटय़ांपैकी एक सुटी गौरीपूजनाची घेतल्यास आणि शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे उन्हाळी सुटी कायम ठेवल्यास शाळांना नाताळची सुटी मिळणे शक्य होणार नाही,’ अशी माहिती दीनानाथ गोरे यांनी दिली.