पुणे : ‘सध्या केवळ माहिती देणारे शिक्षण दिले जाते. त्यात भाषिक आणि गणिती तार्किक बुद्धिमत्तेचा विचार केला जातो. आता भाषिक, तार्किक क्षमतांना ‘एआय’ने आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे शाळांमधून मिळणाऱ्या शिक्षणाचा पुनर्विचार आवश्यक आहे,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले. अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तरे दिल्यास अपेक्षित गुण मिळतात, हा विचार सोडावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकविज्ञान संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने आयोजित डॉ. शंतनू अभ्यंकर स्मृती व्याख्यानात ‘एआय’ ताकद, मर्यादा आणि आव्हाने’ या विषयावर सावंत बोलत होते. डॉ. मंदार परांजपे, ॲड. श्रीपाल ललवाणी, डॉ. अनंत फडके या वेळी उपस्थित होते.

सावंत म्हणाले,‘यंत्रवत जगणे बंद करून निखळ मानवी क्षमतांचा विकास करणे ही गरज आहे. मानवाला त्याच्या क्षमतांचा वापर करावा लागणार आहे. सध्या भाषिक आणि गणिती तार्किक बुद्धिमत्ता हा निकष शिक्षणात सर्वात महत्वाचा आहे. मात्र, ‘एआय’ आपल्यासमोर याच बाबतीत आव्हान निर्माण करत आहे. त्यामुळे कुतूहल, सर्जनशीलता, मूल्यनिष्ठा, सारासार विचार इत्यादी मानवी कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. शाळांमधून शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.’

‘आशयनिर्मिती, संगीत, ग्राफिक्स-ॲनिमेशन अशा विविध क्षेत्रात ‘एआय’चा प्रभावी वापर करता येतो. त्याच्या आधारे माहितीचे विश्लेषण, पृथ:क्करण करणे सहज शक्य आहे. शिक्षक, सल्लागार, मित्र अशा अनेक भूमिका ‘एआय’ निभावताना दिसतो. ‘एआय’ हे वापरणे आवश्यक होत असून, त्याची भीती न बाळगता ते आत्मसात करणे आवश्यक आहे. ते करत असताना सर्जनशीलतेला, चौकटीबाहेर विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत,’ अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले,‘‘एआय’मुळे रोजगाराचे काही प्रकार संपुष्टात येतील. विशिष्ट कार्यप्रणाली असलेले व्यवसाय आता बंद होत आहेत. सर्जनशीलता नसलेले, केवळ कृत्रिम स्वरूपाचे व्यवसाय संपतील. जगातील बहुतांश माणसे काम करताना निखळ मानवी क्षमता वापरत नाहीत. त्यामुळे अकार्यक्षम वर्ग निर्माण होण्याचा धोका आहे. ‘एआय’ला शिकण्यासाठी अमर्याद माहितीची गरज असते. मोठ्या प्रमाणात वीज आणि आर्थिक गुंतवणूक करावी लागते. एवढे असूनही ते केवळ सर्जनशीलतेचा भास निर्माण करते. मूळ विदामध्ये असलेल्या समजुती, त्यांचा प्रभाव माहितीवर मिळतो. त्यामुळे तुम्ही काय विकत घ्यायचे, कोणत्या प्रकारचा आशय बघायचा, माहिती घ्यायची आणि काय निवडायचे याचे स्वातंत्र्य संपुष्टात येत आहे.’

वर्षानुवर्षे आपल्याला विशिष्ट कार्यप्रणाली आत्मसात करण्याचे शिक्षण दिले गेले. त्यामुळे शिस्त आणि आज्ञापालन ही मूल्ये झाली. आपण कोण आहोत, याचा पुनर्शोध घेण्याची गरज आता ‘एआय’ने निर्माण केली आहे. – विवेक सावंत, मुख्य सल्लागार, एमकेसीएल

 ‘एकच भाषा शिका

‘एआय’मुळे जवळ जवळ सर्वच भाषांमध्ये अचूक भाषांतर करणे सहज शक्य होते आहे. त्यामुळे मुलांना इंग्रजी शाळांत घालायची कोणतीही गरज पडणार नाही. तो केवळ सांस्कृतिक प्रश्न म्हणून शिल्लक राहील. नोकरीसाठी, जागतिक बाजारात काम करण्यासाठी इंग्रजीची आवश्यकता राहणार नाही. स्थानिक भाषांमध्ये जागतिक व्यवहारही सहज शक्य होणार आहेत. त्यामुळे एकच भाषा शिका. ती चांगली शिका,’ असे मत विवेक सावंत यांनी व्यक्त केले.