लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून दोन वर्षांच्या कामाचा अहवाल मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून ‘थेट भेट’ या मासिकाच्या निर्मितीचा घाट एका आमदाराने घातला. ‘आपले सरकार कामगिरी दमदार’ अशी मुद्रा ठळकपणे झळकताना ‘स्वच्छ पुणे, डिजिटल पुणे, स्मार्ट पुणे’ घडविण्याची ग्वाही या आमदाराने दिली आहे. हे आमदार आहेत विजय काळे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी ‘थेट भेट’ मासिकाद्वारे दोन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडला आहे. महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर विविध क्षेत्रातील प्रगतीचा वेध घेत ‘आता बदल दिसतोय, महाराष्ट्र घडतोय’ असे अभिवचन काळे यांनी दिले आहे. या मासिकाद्वारे मी करीत असलेल्या कामांची माहिती मिळेलच; त्याचबरोबरीने आपल्याला काही उपयुक्त सूचना करावयाच्या असतील किंवा लेख लिहू इच्छित असल्यास त्यासाठी या माध्यमाचा व्यासपीठ म्हणून उपयोग करता येईल, असे आवाहन विजय काळे यांनी आपल्या मनोगतातून केले आहे.

केंद्र सरकारची गेल्या दोन वर्षांतील महत्त्वाच्या कामांची सूची देण्यात आली आहे. महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज योजना, सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, उज्ज्वल योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आणि सर्वासाठी घरयोजना या महाराष्ट्र सरकारच्या काही वैशिष्टय़पूर्ण योजनांची माहिती मतदारांना दिली आहे. आमदार म्हणून दोन वर्षांत केलेल्या विविध विकास कामांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. आमदार निधीतून अर्थसाह्य़ केलेल्या कामायनी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, आलेगावकर माध्यमिक विद्यालय आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनियर कॉलेज, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विद्यापीठ हायस्कूल, औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, भारत इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, हुतात्मा राजगुरू विद्यालय या संस्थांनी काळे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी लिहिलेली पत्रेही या अहवालात पाहावयास मिळतात. दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेतील उपस्थितीबाबत मतदारांना स्पष्टपणाने माहिती देण्यात आली आहे.