पिंपरी-चिंचवडच्या करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांची एकीकडे उधळपट्टी सुरू असताना, दुसरीकडे शहरातील उद्यानांमध्ये विरंगुळ्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व बालगोपाळांना प्रवेश शुल्क आकारण्यात येणार, हे कदापि चालणार नाही, अशी भूमिका भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली आहे. पालिकेच्या सर्व उद्यानासाठी प्रवेश शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने पालिकेचे प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरात एकूण १९५ सार्वजनिक उद्याने आहेत. पर्यावरण हिताचा विचार करतानाच करदात्या नागरिकांना मोकळा श्वास घ्यावा, आयुष्यातील काही क्षण विरंगुळा म्हणून जगता यावे, या हेतूने शहरभरात विविध उद्याने विकसित केली आहेत. उद्यानांमध्ये हजारोंच्या संख्येने शहरवासिय गर्दी करतात. उद्यान प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार, नागरिकांकडून २० रुपये, बालकांकडून १० रुपये आकारले जाणार आहेत. वास्तविक, पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या बहुतांश कामांमध्ये उधळपट्टी सुरू आहे. शक्य झाल्यास तो खर्च कमी करावा. जेणेकरून प्रवेश शुल्क घेण्याची वेळ येणार नाही.
आयुक्तांची मानसिकता शहरविकासाच्या दृष्टीने हिताची नाही. प्रशासनाच्या कारभाराविषयी पिंपरी-चिंचवडकरांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. अशा कारभाराला वेळीच आवर घालावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.