महापालिका निवडणुकीत पर्वती-जनता वसाहत (प्रभाग क्रमांक ५६ ब) येथून निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५६ मधील ब जागेवर गदादे निवडून आल्या होत्या. निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करताना गदादे यांनी ५ सप्टेंबर १९९० रोजीचा जन्म दाखला अर्जाबरोबर जोडला होता. मात्र, हा दाखला बनावट असल्याची तक्रार याच प्रभागातून निवडणूक लढलेल्या अन्य उमेदवारांनी एकत्रित रीत्या केली होती. गदादे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९९१ रोजी झालेला असल्यामुळे त्यांचे वय महापालिका निवडणुकीचा अर्ज सादर करताना एकवीसपेक्षा कमी होते, अशी अन्य उमेदवारांची तक्रार होती व त्यांनी त्यासाठीचे पुरावेही दिले होते. गदादे यांनी बनावट दाखला सादर करण्यासाठी महापालिकेच्या जन्म नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून दाखला मिळवल्याचाही आरोप करण्यात आला होता. या संबंधीचा खटला येथील जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाने गदादे यांचे पद रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्या निर्णयाला गदादे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
गदादे यांना शाळा सोडताना जे प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी गदादे यांचा जन्मदिनांक ५ सप्टेंबर १९९१ असल्याची नोंद केली होती. तसेच रुग्णालयातील रजिस्टरची तपासणी केली असता त्यातही गदादे यांच्या जन्म दिनांकाची नोंद तीच असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ३१ जानेवारी २०१२ रोजी उमेदवारीअर्ज भरताना गदादे यांचे वय एकवीस नसल्याचे सिद्ध झाले. न्यायालयानेही या बाबी मान्य केल्या. त्यामुळे गदादे यांचे पद रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिका निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विरोधी पक्षनेता हे पद मिळाले होते. मात्र, कल्पना बहिरट यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आक्षेप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्यांचे पद रद्द झाले आणि विरोधी पक्षनेता हे पद २८ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसकडे गेले. गदादे यांचे पद रद्द झाल्यामुळे आता मनसेचे संख्याबळ आता २७ झाले आहे.