डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पोलीस विविध शक्यतांचा तपास करत असले, तरी त्यांना मुख्य आधार उरला आहे तो मोबाइल टॉवर्सचा आणि त्याद्वारे मिळणाऱ्या गुतागुंतीच्या माहितीचा! त्यासाठी मुंबईहून विशेष पथक पुण्यात आले असून, ते हत्या झालेल्या भागातील मोबाइल टॉवरद्वारे मिळालेल्या माहितीचा गुंता सोडवण्यात गुंग झाले आहे.
डॉ. दाभोलकर यांची हत्या गेल्या मंगळवारी झाली. त्याच्या तपासात पुण्यातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी गुंतले आहेत. याशिवाय इतर भागातूनही वेगवेगळ्या प्रकारची मदत घेण्यात येत आहे. पोलिसांना हल्लेखोरांच्या मोटारसायकलचा क्रमांक मिळाला. मात्र, तो परिपूर्ण नसल्याने त्या क्रमांकाच्या अनेक मोटारसायकली आणून पोलिसांनी तपास केला. मालकांची चौकशीसुद्धा केली. त्यासाठी अहमदनगर तसेच, इतर गावाहूनही काही लोकांना चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. याशिवाय साक्षीदार व सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे काही माहिती मिळाली. मात्र, ती या गुन्ह्य़ाचा उलगडा करण्यासाठी पुरेशी नाही.
दाभोलकर हे हत्येच्या आदल्या रात्री मुंबईहून पुण्यात आले. हल्लेखोरांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी दाभोलकर यांचा मुंबईपासून पुण्यापर्यंत पाठलाग केला का, या शक्यतेवरही पोलीस तपास करत आहेत. याशिवाय दाभोलकर यांच्या विचारांच्या विरोधात असलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे. हे सर्व केल्यानंतरही ठाम काही हाती लागलेले नाही किंवा तशी शक्यतासुद्धा निर्माण झालेली नाही. त्यामुळे आता पोलिसांना मोबाइल टॉवरवरून मिळणाऱ्या माहितीचा आधार उरला आहे. मात्र, ही माहिती खूप मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे तिचा गुंता सोडवण्यासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे खास पथक पुण्यात आले आहे. त्यात दोन अधिकारी व सहा कर्मचारी यांचा समावेश आहे.
दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी आणि हत्या झाली त्या ठिकाणी कोणत्या क्रमांकाचे मोबाइल होते, हे मोबाइल टॉवरच्या माहितीवरून समजणार आहे. मात्र, एका टॉवरचे क्षेत्र साधारणत: एक किलोमीटरच्या त्रिज्येत असते. त्यामुळे एका टॉवरच्या क्षेत्रात काही हजार मोबाइल असू शकतात. शिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे टॉवर असल्याने हजारो मोबाइलची माहिती जमा झाली आहे. ही माहिती एकत्र करणे आणि त्यातील संशयित क्रमांकांचा शोध घेणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यासाठी अनुभवी पथक मुंबईहून आलेले आहे. त्यांना पुण्यातील पोलीस मदत करत आहेत. अशा प्रकारच्या तपासाद्वारे हल्लेखोरांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, असे पोलीस सांगत आहेत. मात्र, याबाबत विचारणा केली असता, तपास सुरू असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.