देशातील प्रसिद्ध खगोलशास्त्रीय संशोधन संस्था असलेल्या ‘आयुका’मध्ये मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून सरावाची रंगीत तालीम (मॉक ड्रील) घेण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या या संस्थेत दुपारी तीन ते रात्री दोन पर्यंत अशी अकरा तास ही मोहीम सुरू होती. राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशातील महत्त्वाच्या ठिकाणी अशी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे, त्याचाच हा एक भाग होता.
देशातील महत्त्वाच्या संस्थांना असलेला धोका लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या सुरक्षेसाठी रंगीत तालीम घेण्यात येत आहे. या ठिकाणीं कारवाई करायची झाल्यास त्यांची माहिती असावी, त्या दृष्टीनेच मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास नॅशनल सिक्युरिटी ग्रुप ची (एनएसजी) एक तुकडी, फोर्स वन, शहर पोलिसांचे शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दल यांनी अत्यंत गुप्तपणे ही रंगीत तालीम केली. यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथकालाही बोलविण्यात आले होते. मात्र, त्यांना अकरा तास बाहेरच थांबावे लागले. मेजरच्या नेतृत्वाखाली एनएसजी आणि फोर्स-वनच्या जवानांनी अकरा तास ही कारवाई केली. रात्री दोनच्या सुमारास ही रंगीत तालीम पूर्ण झाली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.