२० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान परीक्षा

पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे  (एमआयडीसी) ८६५ पदांसाठी दोन वर्षे प्रलंबित असलेल्या परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एमआयडीसीतर्फे  २० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज भरून परीक्षेची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

एमआयडीसीने २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार असा प्रश्न उमेदवारांकडून सातत्याने विचारण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे.

परीक्षेबाबतच्या सूचना उमेदवारांना ई मेल आणि लघुसंदेशाद्वारे पाठवल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी खुला प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) यापैकी एक पर्याय निवडावा लागेल.

पर्याय निवडल्यानंतर उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. त्या संबंधित सविस्तर सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा केंद्र उपलब्ध होण्यात काही अडचणी येत आहेत. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तीन पर्यायांपैकी एक ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून दिले जाईल. पण पर्याय उपलब्ध नसल्यास उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायापैकी इतर नजिकच्या जिल्ह्य़ातील परीक्षा केंद्र दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.