पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये पाच दिवसांच्या रखडपट्टीनंतर २६ मे रोजी पुन्हा आगेकूच सुरू केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास शुक्रवारीही (२७ मे) सुरू होता. पोषक वातावरण असल्याने आता मोसमी पावसाच्या भारतातील प्रवासाला मुहूर्त सापडला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजेच रविवार किंवा सोमवापर्यंत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. दरम्यान, सध्या केरळसह दक्षिणेतील बहुतांश भाग आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

सर्वसाधारण वेळेआधी १६ मे रोजी अंदमानात दाखल झालेल्या मोसमी पावसाने जोरदार सुरुवात केली असली, तरी पोषक वातावरण नसल्याने त्याचा पुढचा प्रवास काहीसा संथ गतीने सुरू होता. २० मे रोजी दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात प्रगती केल्यानंतर पाच दिवस मोसमी पावसाची रखडपट्टी सुरू होती. २६ मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात त्याने प्रगती सुरू केली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ मे रोजी दक्षिण अरबी समुद्रातील आणखी काही भागासह, मालदिव, लक्षद्विप, कोमोरीन आदी भागातही त्याने प्रवेश केला. निम्म्या श्रीलंकेतही त्याने प्रवेश केला असून, दक्षिण आणि पश्चिमेकडून भारताच्या किनारपट्टीपासून काही अंतरापर्यंत मोसमी वाऱ्यांनी प्रवास पूर्ण केला आहे. बंगालच्या उपसागरातही त्याने किंचित प्रगती केली आहे.

पाऊसभान..

अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. केरळ आणि दक्षिणेकडील काही भागासह लक्षद्विपमध्ये सध्या जोरदार पाऊस होत असून, पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची हजेरी आहे.

पोषक स्थिती..

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण आहे. दक्षिण अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे केरळ आणि किनारपट्टीच्या भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर ढग जमा होत आहेत. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातही मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक स्थिती आहे. त्यातून मोसमी पाऊस केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होऊ शकतो.

महाराष्ट्रातील आगमन..

राज्याच्या बहुतांश भागात सध्या दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहात आहे. ३० मे पासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.