पुणे : पावसाळ्यामुळे शहरात डेंग्यूसह कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. अनेक खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळा रुग्णांकडून डेंग्यूच्या तपासणीसाठी जास्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांनी डेंग्यूच्या तपासणीसाठी ६०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू नये, असे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सर्व खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांसाठी पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे, की कीटकजन्य आजारांचे निदान झालेल्या रुग्णांची माहिती खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांनी महापालिकेला वेळेत कळवावी. पावसाळ्यात डेंग्यूचा संसर्ग वाढत असल्याने तपासणी करण्याचेही प्रमाण वाढते. या तपासणीसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. यामुळे राज्य सरकारने डेंग्यूच्या तपासणीचा दर ६०० रुपये निश्चित केला आहे. त्यानुसार शहरातील रुग्णालये आणि प्रयोगशाळांनी तपासणीसाठी यापेक्षा जास्त पैसे आकारू नयेत. महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आणि गाडीखाना येथील रुग्णालयात डेंग्यूच्या तपासणीची सुविधा सुरू आहे.
या ठिकाणी रुग्णांची मोफत तपासणी केली जात आहे. पावसाळ्यात हिवतापाच्या रुग्णसंख्येतही वाढ होते. त्यामुळे या रुग्णांचे जलद निदान व्हावे, यासाठी महापालिका रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची हिवताप तपासणी करण्यात येत आहे. याचबरोबर आशासेविकांकडून घरोघरी जाऊन ताप रुग्णांचे सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आशासेविकांना तपासणी किट देण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
डेंग्यूचे ३६ संशयित रुग्ण
पुण्यात जून महिन्यात डेंग्यूचे ३६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षभरात डेंग्यूचे १६६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ८ जण डेंग्यूचे निदान झालेले आहेत. याचवेळी चिकुनगुन्याचे ८ रुग्ण आणि हिवतापाचे ८०७ रुग्ण आढळले आहेत. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा संसर्ग वाढल्याने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याच्या उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू आहेत.