पुण्यातील शीतसाखळी उपकरणे (कोल्ड चेन) देखभाल व दुरुस्ती केंद्राला आता केंद्र सरकारचे अधिक आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. हे प्रशिक्षण केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेशी (एनआयएचएफडब्ल्यू) संलग्न करण्यात आले असून त्याद्वारे इतर राज्यातील शीतसाखळी तंत्रज्ञांनाही दुरुस्ती व देखभालीसंबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या राष्ट्रीय शीतसाखळी प्रशिक्षण केंद्रासाठी शासन निर्णयाद्वारे स्वतंत्र नियामक मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशिक्षण केंद्राला अधिक निधी व मनुष्यबळ मिळण्यास मदत मिळणार असल्याचे राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी सांगितले.
सहायक संचालक (परिवहन) विनायक महाजन म्हणाले, ‘‘शीतसाखळी उपकरणे देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र आता एनआयएचएफडब्ल्यूच्या साहाय्याने नियमित प्रशिक्षण संस्था म्हणून काम करणार असून त्याद्वारे विविध राज्यातील शीतसाखळी तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जाईल. यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण सत्रांचा समावेश असेल. आईस लाईन रेफ्रिजरेटर, उणे तापमान राखू शकणारा डीप फ्रिजर, वॉक इन कूलर, वॉक इन रेफ्रिजरेटर, स्पेशल निओनॅटल केअर युनिट अशा विविध उपकरणांच्या दुरुस्तीबद्दलचे प्रशिक्षण दिले जाईल. परदेशी बनावटीच्या शीतसाखळी उपकरणांचे सुटे भाग अनेकदा मिळत नाहीत. या उपकरणांची दुरुस्ती साध्य व्हावी यासाठी त्यांना योग्य ठरू शकतील असे भारतीय बनावटीचे सुटे भाग सुचवणे, अशी कामेही हे केंद्र करेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More support from central govt for cold chain maintenance and repairy centres
First published on: 26-11-2013 at 02:35 IST