पुणे : शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अकरावी प्रवेशांची मुदत उद्या (१५ ऑक्टोबर) संपत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ७८ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, यंदा सुमारे ३३ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> पुण्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पावसाचा वाहतुकीवर परिणाम

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आले. प्रवेशासाठी तीन नियमित, तीन विशेष प्रवेश फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांसाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या फेरीत विद्यार्थ्यांना दररोज प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे वेळापत्रकानुसार उद्या प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ३१८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ११ हजार ७५० जागा उपलब्ध होत्या. त्यात कोट्याअंतर्गत प्रवेशांसाठी १५ हजार ४१८ जागांवर १० हजार १७२ प्रवेश झाले. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध ९६ हजार ३३२ जागांवर ७६ हजार ४९ प्रवेश झाले. तर एकूण ७८ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे ३३ हजार १२३ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अद्याप किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

– महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक