लघुउद्योग क्षेत्रासाठी काम करणाऱ्या लघु उद्योग भारतीच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे रविवारी चिनी मालाची होळी करण्यात आली. तसेच चीननिर्मित माल, वस्तू यांवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेण्यात आली. गेल्या काही वर्षांत चीनकडून भारतात होणारी आयात मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे तीन कोटी रोजगार हिरावले गेले आहेत. महाराष्ट्रातील सुमारे लाखभर लघुउद्योग बंद पडले आहेत. या पाश्र्वभूमीवर हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. लघु उद्योग भारतीचे प्रदेश महामंत्री रवी सोनावणे, पुणे विभाग अध्यक्ष रवींद्र प्रभुणे, कोशाध्यक्ष सनदी लेखापाल महेंद्र देवी, कमलेश पांचाळ, डॉ. दिलीप कुलकर्णी, राष्ट्रीय मुस्लिम विचारमंच महाराष्ट्राचे निमंत्रक इरफान पठाण, उद्योजक चांदभाई चव्हाण यांच्यासह लघु उद्योजक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. याबाबत बोलताना लघु उद्योग भारतीचे रवी सोनावणे म्हणाले, दरवर्षी भारतात चीनकडून ६४ लाख कोटी आयात होते तर, भारताकडून चीनमध्ये केवळ १२ लाख कोटी इतकी निर्यात होते. त्यातही भारताकडून कच्चा माल निर्यात होतो. तर चीनकडून तयार माल भारतात येतो. हा केवळ आर्थिक विषय नसून चीनपासून भारताच्या सुरक्षेलादेखील धोका आहे. आर्थिक समस्येबरोबरच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतासारख्या देशांत आपली बाजारपेठ भक्कम करून चीन स्वत: सामरिक साम्राज्य बळकट करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षा समोर ठेवून आंदोलन करण्यात आले आहे. वर्षभर या विषयाबाबत जनजागरण आणि लघु उद्योगांमार्फत चीनच्या मालाला पर्यायी उत्पादन हे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. मागील वर्षी कोल्हापूर येथे चीनच्या उत्पादनांपेक्षा स्वस्त आणि चांगल्या दर्जाची उत्पादने तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला असून वर्षभर महाराष्ट्रासह देशभरात हा प्रयोग लघुउद्योग भारतीच्यावतीने राबविण्यात येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानात चीनची उत्पादने विकण्यास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे, असेही सोनावणे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement against china goods in pune
First published on: 29-05-2017 at 03:02 IST