घाईघाईत बीआरटी सुरू करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, उद्घाटनाची घाई कशाला, अशा घोषणांचे फलक घेऊन काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार न करता सत्ताधाऱ्यांनी केवळ श्रेयासाठी नगर रस्त्यावर बीआरटी सेवा सुरू केली, असा आरोप सभेत करण्यात आला. पीएमपी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नगर रस्ता बीआरटी मार्गात अपघात होत असल्याचीही तक्रार या वेळी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर रस्त्यावरील बीआरटी सेवा सुरू होऊन तीन आठवडे झाले असले तरी या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर रोज छोटे-मोठे अपघात होत असून बीआरटीचे प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी हा मार्ग धोकादायक झाला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळेही या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. बीआरटी मार्गातून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाची धडक बसल्याने बुधवारी सकाळी एक मुलगी गंभीर जखमी झाली. या अपघातीचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

सभा सुरू होताच सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा निषेध करणारे फलक घेऊन काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक घोषणा देऊ लागले. उपमहापौर मुकारी अलगुडे, विरोधी पक्षनेता अरिवद िशदे, भाजपचे गटनेता गणेश बीडकर, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, नगरसेवक दिलीप काळोखे, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, प्रशांत बधे, योगेश मोकाटे, अविनाश बागवे, सुधीर जानज्योत यांच्यासह अनेक नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते.

बीआरटी सुरू करण्याची घाई का केली, असा प्रश्न भाजपचे गटनेता बीडकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरात घोषणा देत पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा सर्वसाधारण सभेला का उपस्थित राहत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित केला.

बीआरटी मार्गावर नेमक्या कोणत्या सेवा-सुविधा आहेत, त्यातील त्रुटी काय आहेत, त्या कधी दूर करणार, याचा खुलासा अभिषेक कृष्णा यांनीच करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेता िशदे यांनी केली.

बीआरटीसाठी आता स्वतंत्र समिती

बीआरटीसाठी अधिकारी व तज्ज्ञांची एक समिती स्थापन करून मार्गाची चाचणी करावी, तसेच या समितीची खात्री झाल्यानंतरच बीआरटी मार्ग सुरू करावा, असा निर्णय बुधवारी सायंकाळी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बीआरटीबाबत आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने बीआरटी मार्गातील त्रुटी दूर करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. रस्ता रुंदीकरण तसेच अतिक्रमणे काढणे, बेकायदा पार्किंग काढणे, प्रवाशांना माहिती देणारे फलक जागोजागी लावणे यासह अनेक उपाययोजना पुढील चार दिवसात पूर्ण करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. बीआरटी मार्गातूनच पीएमपीच्या गाडय़ा जातील, याकडे लक्ष देण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आली. आढावा घेण्यासाठी २६ मे रोजी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. तसेच दर मंगळवारी प्रवासी संघटनांबरोबर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, अशीही सूचना बैठकीत देण्यात आली.

चार वर्षांपासून हा बीआरटी मार्ग वापरात नव्हता. उद्घाटनाची घाई करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या चुकीमुळे अपघात घडला आहे. या मार्गावर बारा वाहतूक पोलिसांची गरज आहे. तसेच महापालिका वॉर्डनही वाढवणार आहे. या रस्त्यावरील अपघातांबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या घटनेतील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे.

प्रशांत जगताप, महापौर

More Stories onचळवळMovement
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement in pune municipal corporation
First published on: 19-05-2016 at 04:44 IST