पुणे शहरातील विविध प्रभागातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्याची गरज आहे. मात्र, महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्यामुळे कामे खोळंबली आहेत. याप्रकरणी भाजपचे खासदार संजय काकडे थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार आहेत. शहराच्या विकास कामात अडकाठी निर्माण करणाऱ्या आयुक्त आणि पालिका प्रशासनाची तक्रार ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि प्रशासन नगरसेवकांना वार्डातील कामामध्ये सहकार्य करत नाही. यापार्श्वभूमीवर शनिवारी खासदार काकडे यांनी नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला ४० नगरसेवकांनी हजेरी लावली होती.  या बैठकीनंतर काकडे म्हणाले की, शहरातील चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या योजनेविषयी माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पूर्वीची निविदा रद्द केल्यानंतर कोणत्या पद्धतीने निविदा काढल्या? त्यातील अटी व शर्ती काय आहेत? पाण्याचे मीटर आणि ऑप्टिकल फाइबर डक्ट स्मार्ट सिटीअंतर्गत बसविले जाणार असताना महापालिका त्यासाठी पुणेकरांचे १९४ कोटी का खर्च करत आहे? यासंदर्भात नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत प्रश्न उपस्थित केले होते. परंतु प्रशासनाने यासंदर्भात उत्तर दिले नाही. पुणेकरांनी विकासासाठी भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाचा विकासाचाच अजेंडा आहे. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांना विकास कामांची माहिती देत नाहीत, असे सांगत याबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.