जेजुरी : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ११२ एकर जमीन असल्याच्या आरोपाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खंडन करून, ‘पुरंदरमध्ये माझ्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे यांच्या नावावर एक इंचही जमीन नाही,’ असे स्पष्ट केले.
नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी गेलेल्या जिल्हा प्रशासनाचे पथक आणि ग्रामस्थांमध्ये कुंभारवळण येथे वाद झाला. त्या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामध्ये काही ग्रामस्थ जखमी झाले. याप्रकरणी आंदाेलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी कुंभारवळण येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्या वेळी एका शेतकऱ्याने ‘या भागामध्ये आपल्या नावावर ११२ एकर जमीन असल्याची चर्चा आहे. ती खरी आहे का?’ असा प्रश्न विचारला. त्या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, ‘माझी एक इंचही जमीन पुरंदरमध्ये नाही. असेल तर मी ती तुम्हाला देते. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे किंवा माझ्या नावावर या तालुक्यात जमीन नाही.’
दरम्यान, कुंभारवळण येथील ज्येष्ठ महिला अंजनाबाई कामठे यांचे राहत्या घरी निधन झाले. कामठे परिवाराचे खासदार सुळे यांनी सांत्वन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते सुदाम इंगळे, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, विजय कोलते आदी उपस्थित होते.
‘कृती समिती स्थापन करा’
विमानतळाला विरोध करण्यासाठी सात गावांमधील सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांची कृती समिती स्थापन करा. त्यामध्ये प्रत्येक गावातील दोघांचा समावेश करण्यात यावा. या समितीमध्ये स्वतः काम करण्यास तयार आहे. समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी सोबत राहणार आहे, असे खासदार सुळे यांनी सांगितले.
‘विमानतळाला विरोध नाही’
‘विमानतळाला विरोध नाही. मात्र, जागेला विरोध आहे. शेतकरी जमीन द्यायला तयार असलेल्या भागातच विमानतळ करावे. लोकांचा विरोध असल्यास बळजबरी करण्यात येऊ नये, अशी माझी भूमिका आहे,’ असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.