महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगांच्या विविध परीक्षांमध्ये वर्षांनुवर्षे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मास कॉपी होत असल्याचा आरोप परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी केला असून त्याबाबत या विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रारही केली आहे.
अनेक विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनेक वर्षे देत असतात. कधी एखादे पद मिळूनही आणखी वरचे पद मिळवण्यासाठीही परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नाव आणि परीक्षेच्या विभागानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक मिळतात. परीक्षेच्या दरम्यान वर्षांनुवर्षे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्या आहेत. या मुलांचे परीक्षा क्रमांक बहुतेक सर्वच परीक्षांसाठी एकाच वर्गात येतात. वर्गात बसण्याच्या जागेत काही अंशी फरक पडतोही पण तो एखाद दुसरे बाक मागे-पुढे इतपतच असतो. त्यामुळे अनेक वर्षे एकाच वर्गात बसून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट तयार झाले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दरम्यान मोठय़ा प्रमाणावर कॉपी होत असते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आयोगाला पत्र दिले आहे. आयोगाने सलग दोन-तीन वेळा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक तपासून ते वेगवेगळ्या वर्गात येतील, याची काळजी घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘अनेक विद्यार्थी वर्षांनुवर्षे एका वर्गात बसून परीक्षा देत आहेत. अशा वर्गात दरवेळी काही प्रमाणात नवे विद्यार्थी जातात. त्या वेळी या नव्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान त्रास होतो. अनेकदा अर्धी प्रश्नपत्रिका एक विद्यार्थी सोडवतो, तर पुढची अर्धी दुसरा विद्यार्थी सोडवतो, असेही प्रकार घडतात. कोणी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आणि कोणता भाग सोडवायचा हे या विद्यार्थ्यांचे ठरलेले असते.’