मुळशी तालुक्यातील अत्यंत डोंगराळ भागात अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीचा उद्योग यशस्वी रीत्या चालवला असून गावातील आधुनिक शेतीची माहिती यंदा फुले-आंबेडकर व्याख्यानमालेच्या रूपाने प्रथमच मांडली जाणार आहे. शेतीची ही यशोगाथा उमेश कंधारे व्याख्यानातून मांडणार आहेत.
मुळशी तालुक्यात डोंगराळ भागात असलेल्या चिंचवड येथे यशस्वी शेतीचा हा प्रयोग सुरू असून कंधारे यांच्या पुढाकाराने परिसरातील काही गावांमधील शेतकरीही त्यात सहभागी झाले आहेत. कंधारे यांची शेती वडिलोपार्जित आहे. अनेक वर्षे हे कुटुंब पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र, सातआठ वर्षांपूर्वी त्यांनी हवामान, बाजारभाव, खते, पाणी, गावात उत्पादित करता येऊ शकणारा भाजीपाला, फळे-फुले आदी विविध घटकांचा अभ्यास सुरू केला. हा अभ्यास झाल्यावर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा निर्णय कंधारे यांनी घेतला आणि स्वत:च्या वीस गुंठे जमिनीत त्यांनी पॉली हाउसमधील शेती सुरू केली. नव्या तंत्राने शेती करण्यापूर्वी त्यांनी परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांचा गट स्थापन केला आणि बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न केले. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक होते. कुणाची जमीन दहा गुंठे, कुणाची पंधरा गुंठे अशी होती. त्यामुळे ते बँकेच्या कर्ज देण्याच्या नियमात बसत नव्हते. तरीही सातत्याने प्रयत्न करून बँकेकडून कर्ज मिळवण्यात कंधारे यांना यश आले.
संपूर्ण देशात मागणी असलेल्या जरबेरा, कार्नेशन या फुलांच्या शेतीचा कंधारे यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. त्या बरोबरच वांगी आणि अन्य भाजीपाला लागवडही यशस्वी झाली आहे. सर्वच शेतकऱ्यांनी योग्यप्रकारे व नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेती सुरू केल्यामुळे उत्पादनही वाढले आहे आणि सर्वाना चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेडही नियमितपणे केली. शेतीचे क्षेत्र कमी असतानाही गावातील सर्वानी मिळून नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यात सर्वानाच यश आले. दोनशे लोकवस्तीचे चिंचवड हे गाव अत्यंत डोंगराळ भागात आहे आणि जिथे पूर्वी फक्त करवंदाची झाडी होती, जेथे काही पिकत नव्हते, तेथे आता गावकरी यशस्वी शेती करत आहेत.
—
पौडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमच्या गावातील आम्ही सर्व छोटे शेतकरी असलो, तरी नव्या तंत्रज्ञानाचा प्रयोग, योग्य प्रकारे कष्ट आणि योग्य प्रयत्न यांच्या आधारे सर्वाची शेती चांगल्या प्रकारे सुरू आहे.
उमेश कंधारे
—
महात्मा फुले प्रतिष्ठानतर्फे आयोजित शेतीविषयक व्याख्यानमालेत शुक्रवारी (४ डिसेंबर) कंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले वाडय़ात ही व्याख्यानमाला चालते. महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष असे यंदाच्या व्याख्यानमालेचे औचित्य आहे. प्रतिष्ठानने चाळीस वर्षांपूर्वी ही व्याख्यानमाला सुरू केली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
मुळशी तालुक्यातील यशस्वी शेतीची कथा उलगडणार
शेतीचा उद्योग यशस्वी रीत्या चालवला असून गावातील आधुनिक शेतीची माहिती यंदा फुले-आंबेडकर व्याख्यानमालेच्या रूपाने प्रथमच मांडली जाणार आहे

First published on: 01-12-2015 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulshi taluka success story agriculture