ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कुलकर्णी यांनी पुणे विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांचे वकील अ‍ॅड. श्रीकांत शिवदे आणि अ‍ॅड. गिरीश कुलकर्णी यांनी न्यायालयात सादर केला होता. ठेवीदाराची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी यांच्याविरोधात पुण्यात ३५१ ठेवीदारांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत.

यंदाच्या वर्षी ठेवीदारांना तीस कोटी रुपये परत करण्यात आले आहेत तसेच गेल्या महिन्यात त्यांनी पाच कोटी रुपये ठेवीदारांना परत केले आहेत. सोळाशे ठेवीदारांनी कंपनीची परतावा योजना (रिफंड स्किम) मान्य केली आहे. मुदत संपलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या ठेवीचे देणे कुलकर्णी यांना परत करायचे आहे. कुलकर्णी यांच्या कंपनीचे ४८ लाख चौरस फुट बांधकाम आहे. या बांधकामाच्या किमतीचा विचार केल्यास देय असलेल्या रकमेच्या पाचपट किंमत आहे. मार्च २०१८ पर्यंत ठेवीदारांना पैसे परत करण्याचे नियोजन आहे. कुलकर्णी यांनी स्वत:हून त्यांचे पारपत्र पोलिसांकडे जमा केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या काही बदलांमुळे त्या कंपनीने व्यवहार केला नाही. त्यात बांधकाम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे परिणाम कुलकर्णी यांच्या नियोजित ड्रीम सिटी प्रकल्पावर झाले. कुलकर्णी यांच्या मोटारीचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. विविध कारणांमुळे कुलकर्णी यांच्या कंपनीसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती अ‍ॅड. शिवदे यांनी युक्तिवादात केली होती. त्यानंतर त्यांना तात्पुरता जामीन मिळाला. मात्र, विशेष न्यायालयाने पुन्हा जामीन नाकारल्यानंतर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.